अंबाजोगाई : युवकावर हल्ला करणाऱ्या दोन आरोपीस दोषी ठरवत पाच वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रूपये दंड अशी शिक्षा येथील अप्पर सत्र न्यायाधीश संजश्री घरत यांनी ठोठावली. विनोद शिंदे व अविनाश कु-हाडे असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या घटनेची थोडक्यात माहिती अशी की, दि. २५/०१/२०१२ सांयकाळी अंदाजे सव्वासात वाजेच्या सुमारास किशोर लोमटे याचे मेडीकल वरीलमुलगा नामे प्रदीप महालंगे यास तु आमच्या गाडीला कट का मारलास म्हणून आरोपी विनोद शिंदे व अविनाश कु-हाडे हे त्यास मारहाण करू लागले. त्यावेळी मध्यस्थी करण्याकरीता गेलेल्या किशोर लोमटेस विनोद शिंदेने चाकुने भोसकून गंभीर जखमी केले. यावरून अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन मध्ये गु. रं.नं. १२/२०१२ गुन्हा दाखल झाला. सदर गुन्हयाच्या तपास होवून आरोपी विरुद्ध मा. न्यायालयात कलम ३०७, ३२३, ५०४,३४ भा. द. वी. प्रमाणे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.
सदर प्रकरणात सरकारी वकील अॅड. लक्ष्मण फड यांनी सात साक्षीदार तपासले. तसेच लातुर येथील डॉक्टर ढगे यांची साक्ष महत्वाची ठरली. अॅड. फड यांचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपींना पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रूपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने शिक्षा अशा प्रकारचा निकाल अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश संजश्री घरत यांनी दिला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. लक्ष्मण फड यांनी काम पाहीले व त्यांना अॅड. अजित लोमटे यांनी सहकार्य केले. दरम्यान युवराज माने व इतर एकाची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.