बीड : जिल्हा रूग्णालयात उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत मयत रूग्णांच्या नातेवाईकांनी ब्रदरला मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. त्यानंतर रविवारी परिचारिका, डॉक्टरांनी कामबंदचा इशारा देत निदर्शने केली. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आता यापुढे डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शस्त्रधारी पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत.शेख आमेर शेख जाफर (वय ३० वर्षे, रा.राजीवनगर बीड) यांचा शनिवारी रात्री अपघात झाला होता. जिल्हा रूग्णालयात आणल्यावर डॉ. राजश्री शिंदे व डॉ. सचिन देशमुख यांनी त्यांना तपासले. यावर नातेवाईकांनी स्वाक्षरी करून रूग्णालयातून खाजगी रूग्णालयात नेले. परत येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर हे सिद्ध झाले. त्यावेळी आक्रमक झालेल्या नातेवाईकांनी रतन बडे नामक ब्रदरला मारहाण केली. त्यानंतर परिचारिका, डॉक्टरांनी एकत्र येत काम बंद आंदोलन सुरू केले. मात्र, संयम बाळगत कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.रविवारी (दि. १०) दुपारी २ वाजता पुन्हा डॉक्टर, परिचारिकांनी निदर्शने केली. यावेळी त्यांनी मारहाण करणाºयांना अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच संरक्षण देण्यासह अनेक मागण्यांचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांना दिले. त्यावर डॉ. थोरात यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. रूग्णालयात पुरेसा बंदोबस्त देण्याचे मान्य केल्यावर कर्मचाºयांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी डॉक्टर, कर्मचारी, सेवक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इतर विभागाच्या संघटनांनीही आरोग्य विभागाला पाठिंबा दर्शविला.‘ते’ पोलीस कोण ? कारवाईची मागणीमारहाण होताना आरसीपी, वाहतूक व खाकी कपड्यांमध्ये काही पोलीस कर्मचारी रूग्णालयात होते.त्यांच्यासमोर मारहाण होत असताना त्यांनी काहीच प्रतिकार केला नसल्याचे कॅमे-यात दिसत आहे.हे पोलीस रूग्णालयात का आले होते? कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न समोर उपस्थित झाल्यानंतरही त्यांनी बघ्याची भूमिका का घेतली? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले.वरील बाबींकडे लक्ष देत परिचारिका, डॉक्टरांनी याची चौकशी व कारवाईची मागणी केली.प्रकरणाची लावली चौकशीआमेर शेख यांच्या मृत्यूबद्दल नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याकडे तक्रार केली. यावर तात्काळ समिती नियुक्त केली असून, सात दिवसांत याचा अहवाल तयार होणार असल्याचे डॉ.थोरात म्हणाले. डॉ. आय. व्ही. शिंदे, डॉ. ए. आर. हुबेकर व डॉ. आर. बी.देशपांडे हे या समितीमध्ये आहेत.त्या दोन पोलीस कर्मचा-यांची हकालपट्टीजिल्हा रूग्णालय पोलीस चौकीत कर्तव्यावरील दोन्ही पोलीस कर्मचारी हे चौकीत बसत नाहीत. त्यांचे नियंत्रण नाही, असा आरोप परिचारिकांनी केला. यावर अधीक्षकांनी त्या दोघांची तात्काळ तेथून हकालपट्टी केली. त्यांच्या जागी दोन पुरूष व दोन महिला पोलीस कर्मचारी नियुक्त केले. तसेच दोन शस्त्रधारी पोलीस कर्मचारी येथे २४ तास बंदोबस्तासाठी असणार आहेत.
बीड जिल्हा रूग्णालयामध्ये यापुढे शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 11:55 PM
जिल्हा रूग्णालयात उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत मयत रूग्णांच्या नातेवाईकांनी ब्रदरला मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. त्यानंतर रविवारी परिचारिका, डॉक्टरांनी कामबंदचा इशारा देत निदर्शने केली.
ठळक मुद्देब्रदरला मारहाण प्रकरण : परिचारिका, डॉक्टरांची निदर्शने; रुग्णांचा विचार करुन कामबंद आंदोलन मागे