बीड : येथील गजबजलेल्या बसस्थानकात एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजता घडली. अशोक केदार (३५ रा. सांगवी ता. केज, हमु. बार्शी नाका, बीड) असे जखमीचे नाव असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, हा वाद थट्टामस्करीतून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अशोक केदार हा तरुण खासगी वाहन चालक आहे. बसस्थानकातील फलाट क्र. ६ च्या बाजूला तो प्रवाशी शोधत होता. यावेळी वाहनचालक संतोष राधाकिसन खापे (रा. सावता माळी चौक, बीड) हा तेथे आला. दोघांमध्ये थट्टामस्करी झाली. त्यानंतर वाद विकोपाला गेला आणि संतोषने स्वत:कडील धारदार शस्त्राने अशोक केदारच्या छातीवर वार केला. यामध्ये अशोक गंभीर जखमी झाला. वार झालेल्या ठिकाणाहून रक्तस्त्राव होत होता. जखमेच्या ठिकाणी रूमाल लावून तो बसस्थानकातील चौकीच्या दिशेने धावला. चौकीसमोर येऊन तो कोसळला. पोहेकॉ जालिंदर बनसोडे यांनी वाहतूक शाखेच्या कर्मचा-यांना बोलावून त्यास तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर संतोष खापे यास ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.
दरम्यान, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने अशोक केदार बेशुद्धावस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. घटनास्थळी कुठलेही शस्त्र आढळून आले नसून संतोष खापे याने ब्लेडने वार केल्याचा दावा केला आहे, तर जखमी अशोक केदारने आपल्यावर चाकूने हल्ला झाल्याचे सुरुवातीलाच पोलिसांना सांगितले. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुुरु होती.नातेवाईकांचा आक्रोश : आरोपी जेरबंदजखमी अशोक केदार यांच्या पत्नीने जिल्हा रूग्णालयात टाहो फोडला. रडताना त्यांनी पोलिसांवर टीका केली.दरम्यान, पोलीस कर्मचारी बनसोडे यांनी आरोपीला बसस्थानकातच पकडले. त्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. बीड बसस्थानकात वाढत्या घटनांना डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी जादा पोलीस कर्मचारी नेमावेत अशी मागणी होत आहे.