- संजय तिपालेबीड : म्हाडाच्या अभियांत्रिकी परीक्षेत मूळ परीक्षार्थ्याच्या नावे परीक्षा देण्यासाठी आलेल्या तोतयास पोलिसांनी पकडले होते. त्याने यापूर्वी दोन वेळा तोतया परीक्षार्थी बनून परीक्षा दिली व दोन्हीही वेळा पकडला गेला, बीडमध्ये म्हाडा परीक्षेचा पेपर देण्याचा त्याचा तिसरा प्रयत्नही फसला. दरम्यान, बगलेत डिव्हाइस व कानात मायक्रो यंत्र ठेवून त्याने पेपर सोडविण्याची शक्कल लढविल्याचे समोर आले आहे.
अर्जुन बाबूलाल बिघोत (२८, रा. जवखेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. तो राहुल किसन सानप (रा. वडझरी, ता. पाटोदा) याच्या जागी म्हाडाच्या अभियांत्रिकी पदाची परीक्षा देण्यासाठी १ फेब्रुवारी रोजी बीडला आला होता. परीक्षार्थींना केंद्रात प्रवेश देताना त्याच्याकडे प्रवेशपत्र मागितले, ते त्याने दिलेही. मात्र, आधार कार्ड मागताच भंडाफोड होण्याच्या भीतीने अर्जुन बिघोतने काढता पाय घेत अचानक पलायन सुरू केले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला व पाठलाग करून त्यास पकडले. त्याच्याकडे डिव्हाइस, मोबाइल व मायक्रो यंत्र आढळून आले. दरम्यान, आरोपीकडे केलेल्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. काळे टी शर्ट घालून तो परीक्षेला यायचा. बगलेत छोटा खिसा करून त्यात तो छोटे डिव्हाइस ठेवायचा. प्रश्नपत्रिका हातात पडताच गुपचूप केंद्रात नेलेल्या मोबाइलने फोटो काढून तो साथीदाराला पाठवायचा. त्यानंतर उत्तरे शोधून तो तिकडून कळवायचा. कानातील मायक्रो यंत्राद्वारे ही उत्तरे समजायची. यापूर्वी औरंगाबादेत दोन वेळा तो तोतयेगिरी करताना पकडला, तेव्हा त्याने अशीच गुन्हे पद्धत अवलंबली होती, असे उपनिरीक्षक शैलेश शेजुळे यांनी सांगितले.
कोऱ्या धनादेशावर व्हायचा व्यवहारआरोपी अर्जुन बिघाेत हा परीक्षार्थ्याकडून कोरा धनादेश घ्यायचा. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पैशांचा व्यवहार व्हायचा, अशी माहिती पुढे आली आहे. बीडमध्ये राहुल सानपकडून त्याने किती रुपये घ्यायचे ठरवले होते, व्यवहार कसा झाला, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, अर्जुन हा एक मोहरा आहे, त्यामागे आणखी काही लोक असावेत, अशी शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. राहुल सानपचाही शोध सुरू असून पथक मागावर असल्याचे पो.नि. केतन राठोड यांनी सांगितले.