बीड : गर्दी, कार्यक्रम, घरासमोर उभा केलेल्या दुचाकी चोरून परजिल्ह्यात विक्री करणाऱ्या कालिदास लहुजी झिंजुर्डे (रा.नागडगाव ह.मु.गोविंदपुर ता.माजलगाव) या अट्टल चोराच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून १४ लाख रूपये किंमतीच्या तब्बल २७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दुचाकीचोराने एक दोन नव्हे तर तब्बल सात जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. अखेर बीड पोलिसांनीच सापळा लावून त्याला बेड्या ठोकल्या.
कालिदास हा दुचाकी चोरण्यात पटाईत आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील बीडसह परभणी, उस्मानाबाद, जालना, लातूर, नांदेड, अहमदनगर अशा जिल्ह्यांमधून त्याने दुचाकी पळविलेल्या आहेत. दुचाकी चोरांची एक टोळी असून कालिदास हा त्याचा म्होरक्या आहे. दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटना वाढत गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
तर चोरट्यांचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. राज्यातील पोलीस कालिदासच्या मागावर होती. परंतु तो हाती लागत नव्हता. मंगळवारी तो माजलगावहून गोविंदपुरला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना मिळाली. त्यांनी सपोनि दिलीप तेजनकर व त्यांच्या टिमला सापळा लावण्यास सांगितले.
दुचाकीवरून जात असतानाच त्याचा पाठलाग करून तेजनकर यांनी त्याला बेड्या ठोकल्या. चौकशीत पोलिसी खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून आतापर्यंत तब्बल २७ दुचाकी जप्त केल्या आहेत. त्याच्या इतर साथीदारांचाही शोध सुरू असल्याचे पोनि पाळवदे यांनी सांगितले. लवकरच टोळीचा पर्दाफाश केला जाईल, असेही ते म्हणाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजनकर, विकास वाघमारे, नसिर शेख, विष्णू चव्हाण, सतीश कातखडे, संतोष म्हेत्रे, गोविंद काळे, सुग्रीव रूपनर, भागवत बिक्कड आदींनी केली.
सहा तालुक्यांतील १० गुन्हे उघडगेवराई पोलीस ठाणे हद्दीत पाच, केज, धारूर, आष्टी, गोंदी व कळंब पोलीस ठाणे हद्दीतील तब्बल १० गुन्हे उघड झाले आहेत.