बीड : ‘गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया...’ असा जयघोष करत लाडक्या गणरायाचे शुक्रवारी भक्तांनी जल्लोषात स्वागत केले. हे करताना भक्तांच्या तोंडाला मास्क होता. कोरोनाबाबत भक्तांनी काळजी म्हणून तोंडाला मास्क लावत गणरायाचे स्वागत केले. गतवर्षी कोरोनामुळे उत्सव साजरा करता आला नाही; परंतु यावेळी निर्बंध घालून उत्सवाला परवानगी दिल्याने भक्त आनंदात न्हाऊन निघाले होते.
मागील वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करता आला नव्हता. यावर्षी हा उत्सव साजरा करण्यासाठी सर्वच भक्त उत्सुक होते; परंतु प्रशासन उत्सवाबाबत काय निर्णय घेते, याकडेही भक्तांचे लक्ष होते. अखेर याबाबत प्रशासनाने काही निर्बंध घालून परवागनी दिली. त्यामुळे भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला. ठिकठिकाणी गणेशमूर्तींचे स्टॉल लागले. शुक्रवारी सकाळीच त्याठिकाणी मूर्ती खरेदीसाठी भक्तांनी गर्दीही केली. ढोल- ताशाच्या गजरात बाप्पाला घरी नेत भक्तांनी प्राणप्रतिष्ठा केली. हे सर्व करताना भक्त कोरोनाबाबतही काळजी घेत असल्याचे दिसले. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असला तरी प्रत्येकाच्या ताेंडाला मास्क लावल्याचे दिसले. दिवसभर गणेशभक्तांचा उत्साह कायम होता.
--
बंदोबस्तासाठी पोलिसांचाही फौजफाटा
शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली होती, तसेच कायदा व सुव्यवस्था, चोऱ्या होऊ नयेत, यासाठी पोलीस कर्मचारी नेमले होते, तसेच वाहतूक व शहर पोलिसांकडून गस्त घातली जात होती. असे असले तरी नेहमीप्रमाणे अरुंद रस्त्यांमुळे आणि गर्दी पाहता वाहतूक कोंडी कायम होती. अतिक्रमणे वाढल्याने आणि बांधकाम करताना पार्किंगला जागा न ठेवल्याने दुकानांसमोर ग्राहकांच्या वाहनांची गर्दी होते. यामुळेच या मार्गावर कायम वाहतूक कोंडी होत असते.
---
पर्यावरणपूरक गणेशमूर्तींनाही मागणी
प्रत्येक वर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्याबाबत सर्व स्तरांतून आवाहन केले जाते. याला दिवसेंदिवस प्रतिसाद मिळत चालला आहे. यावर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना जास्त मागणी होती, तसेच अनेकांनी त्याची प्राणप्रतिष्ठा करून इतरांनाही करण्याबाबत आवाहन केले.
--
चिमुकल्यांचाही उत्साह
लॉकडाऊनमुळे उत्सव साजरे करता आले नाहीत; परंतु यावर्षी लाडक्या बाप्पांचे स्वागत करण्यासाठी काही प्रमाणात सूट दिली आहे. त्यामुळे दीड वर्षापासून घरात असलेले आणि उत्सव साजरा न करता आल्याने कोंडून राहिलेले चिमुकले शुक्रवारी मूर्ती खरेदी करण्यासाठी बाहेर पडले. यावेळी डोक्याला पट्टी आणि ‘गणपती बाप्पा मोरया...’ असा जयघोष त्यांच्या तोंडून केला जात होता. त्यांचा उत्साह गगनात मावत नसल्याचे दिसले.