शिरूर कासार : वसंत ऋतूच्या आगमनाचा संदेश देत लाल, केसरी-भगव्या रंगात फुलणाऱ्या पळस पुष्पसौंदर्यात अतिदुर्मिळ पिवळ्या पळसाच्या बहराने भर पडली आहे. बीड तालुक्यात एकमेव पिवळा पळस दिमाखात बहरलेला आहे, तर अन्य ठिकाणी पिवळा पळस येत्या काही वर्षांत फुलणार आहे.
दुर्मिळ वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र व सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सर्पराज्ञी येथे रोपवाटिका तयार केली आहे. तेथे मागील वर्षापासून बीड जिल्ह्यात आढळणाऱ्या दुर्मिळ वृक्षांपैकी गोरख चिंच, कैलासपती, रुद्राक्ष, पिवळा पळस, पांढरी गुंज, मोह, बिबवा, रिठा, बेहडा, हिरडा, काटेसावर आदी वृक्षांच्या बियांपासून किंवा गुटी कलमाद्वारे वृक्षांची रोपे तयार केली जात आहेत.
गतवर्षी ५०,००० रोपे तयार केली होती. याही वर्षी ५०,००० रोपे तयार करण्याचा मानस असल्याचे सिद्धार्थ सोनवणे व सृष्टी सोनवणे यांनी सांगितले. निसर्गप्रेमींनी आपल्या परिसरात, शेतात, गावात, शहरात, जंगलात जर एखादा दुर्मिळ वृक्ष असेल, तर त्याची माहिती सर्पराज्ञीस देऊन निसर्ग संवर्धनास हातभार लावण्याचे आवाहन सिद्धार्थ सोनवणे यांनी केले आहे. स्थानिक, तसेच परदेशी; परंतु येथील पर्यावरणासाठी उपयुक्त असणाऱ्या दुर्मिळ वृक्षांचे संरक्षण, संवर्धनाच्या हेतूने या रोपवाटिका तयार केल्याचे ते म्हणाले.
पिवळा पळस अतिदुर्मिळ असून, महाराष्ट्रात काही ठिकाणीच त्याचे अस्तित्व दिसून येते. त्यापैकी बीड जिल्ह्यामध्ये या अतिदुर्मिळ पिवळ्या पळसाचे एक झाड आहे. संशोधन आणि संवर्धन न झाल्यामुळे पिवळा पळस दिवसेंदिवस दुर्मिळ होत आहे. पिवळ्या पळसाच्या बियांची उगवण क्षमता ही शंभर टक्के चांगली असून, चांगल्या पद्धतीने बीजारोपण होत असल्याचे सर्पराज्ञीत सिद्ध झाल्याचे सिद्धार्थ सोनवणे म्हणाले.
पिवळ्या पळसाचे संशोधन, संवर्धन आणि लागवडीचे कार्य हे सर्पराज्ञीने हाती घेतले असून, दुर्मिळ वृक्षांना नवसंजीवनी मिळेल. सर्पराज्ञी बिया व गुटी कलमाद्वारे दुर्मिळ वृक्षांचे रोपण करून त्याचे संवर्धन करणार असल्याची माहिती सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी सोनवणे यांनी दिली.
पळस ‘पक्ष्यांचा ज्यूस बार’
सर्पराज्ञीत बियांपासून तयार झालेल्या जवळपास अडीचशे पिवळ्या पळसांच्या रोपांची लागवड यावर्षी केली आहे. पिवळ्या पळसाला येणारी फुले पिवळी येतात की लाल, केशरी की भगवी हे येणारा काळच सांगेल.
पळसाच्या पंचांगांचा उपयोग आयुर्वेदामध्ये केला जातो, तसेच काटेसावर, पांगारा या झाडांप्रमाणेच पिवळ्या पळसालाही ‘पक्ष्यांचा ज्यूस बार’ म्हणून ओळखले जाते.