उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत रमेश चव्हाण यांना धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. १९ सप्टेंबर रोजी घोसापुरी शिवारात दुपारी १ वाजता ही घटना घडली. यावरून आठ जणांवर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
घोसापुरी शिवारात कैलास गडाच्या पायथ्याला गायरान जमीन आहे. २००७ मध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास गायरानातील २३ एकर जमीन शासनाने दिलेली आहे. मात्र, ही जमीन ३० वर्षांपासून कसत असल्याचा दावा करत भारत लक्ष्मण कांबळे (रा. घोसापुरी) यांनी दाखल केला होता. जमिनीच्या मालकी हक्काचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. १९ रोजी दुपारी १ वाजता या जमिनीची पाहणी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण हे सहकाऱ्यांसमवेत गेले होते. यावेळी भारत कांबळे व इतर अनोळखी सहा ते सात जणांनी मिळून त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. मुलाबाळांना जीवे मारण्याच्या धमक्या देत धक्काबुक्की केली. चव्हाण यांनी बीड ग्रामीण ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याच्या कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला. आराेपी फरार असून तपास सहायक निरीक्षक योगेश उबाळे आहेत.