लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अरुण दत्तात्रय मोरे यास अपर सत्र न्यायालयाने सोमवारी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यास मंगळवारी (दि. ७) न्यायालयासमोर हजर केले असता त्याची रवानगी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. याच प्रकरणात सोमवारी करुणा अशोक शर्मा यांना देखील न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
रविवारी परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून करुणा शर्मा आणि अरुण दत्तात्रय मोरे (दोन्ही रा. मुंबई) यांच्यावर परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ सह ॲट्राॅसिटीसारख्या गंभीर कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा नोंद आहे. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले होते. सोमवारी त्यांना अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी तर अरुण मोरे यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.
दरम्यान, मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने अरुणला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सरकारी पक्षाने अधिक तपास करण्यासाठी चार दिवसांच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने अरुण मोरेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याची रवानगी बीडच्या जिल्हा कारागृहात करण्यात आली. या प्रकरणात फिर्यादीतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अशोक कुलकर्णी तर आरोपीच्या वतीने ॲड. श्रीकांत गलांडे यांनी काम पहिले.