Pankaja Mundhe ( Marathi News ) : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आहे, यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष आहेत. आगामी निवडणुकीत हे पक्ष एकत्र निवडणुका लढणार अशी चर्चा सुरू आहे. यामुळे काही नेत्यांची अडचण झाली आहे. बीडमध्येही अशीच काही परिस्थिती आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना नवा मतदारसंघ शोधावा लागणार असल्याचे बोलले जात आहे. यावर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
"आमच्यासोबत नवे पक्ष आल्यामुळे मला आता मतदारसंघ राहिलेला नाही. या चर्चा नेहमी होत असतात. मला कुठे जायला आवडेल हा मुद्दा नाही. आता कुठे जायला आवडेल याला विलंब झाला आहे. माझ्या लोकांना जे बीड जिल्ह्याच्याही बाहेर आहेत त्यांना मी कुठे पाहायला आवडेल हे महत्वाच आहे. इश्वराच्या कृपेने त्यांना तिथे मी असावे असं वाटतं तिथे मी दिसले तर मोठी गोष्ट आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
'कोणतीही निवडणूक जाहीर झाली की लगेच माझ नाव समोर येतं, माझ्या नावाची चर्चा जोरदार सुरू असते. विधान परिषद, राज्यसभा सगळीकडे तिच परिस्थीती. आता माझ्या नावाची चर्चा झाली तर मला यात काही नाविन्य वाटत नाही. अनेक वर्ष झाली मी पदाच्या प्रतिक्षेत आहे असं सगळ्यांना वाटतं त्यामुळे माझ्या नावाची चर्चा सुरू असते, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंकजा मुंडे यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. काही दिवसापूर्वी पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू होती, यानंतर त्यांनी काही दिवस ब्रेक घेतला होता. यानंतर त्यांनी महाराष्ट्र दौरा केला होता. काल भाजपच्या 'गाव चलो अभियानात' पंकजा मुंडेंनी हजेरी लावली, यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.