सोमनाथ खताळ
बीड : तालुक्यातील पिंपळनेर पोलिस ठाणे हद्दीतून शेतात बांधलेली खिल्लारी बैल जोडी चोरून फरार झालेल्या मित्रांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन दिला. बाहेर येताच यातील दोन मित्रांनी दुचाकी चोरी सुरू केल्या. त्या दाेघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दुचाकी लातूर, धाराशिव जिल्ह्यातून चोरल्याचा संशय असून दुचाकी मालकांचा शोध पाेलिस घेत आहेत.
कृष्णा नवनाथ रूपनर (२०), रामा रमेश गोरे (२३ दोघेही रा. हिवरापहाडी ता. जि. बीड) असे चोरट्यांची नावे आहेत. या दोघांनी आपल्या इतर तीन मित्रांना सोबत घेऊन मागील महिन्यात गावातीलच खिल्लारी बैलजोडी चोरली होती. ही जोडी विक्री करण्याआधीच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर या दोघांनाही न्यायालयाने जामिनावर सोडले.
या चोरट्यांनी सुधारण्याऐवजी पुन्हा चोरी करण्यास सुरुवात केली. हे दोघेही सोमवारी दुचाकी चोरीसाठी भाजीमंडईत आल्याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी सापळा रचून त्यांना पकडले. त्यानंतर त्यांच्याकडून सहा दुचाकीही जप्त करण्यात आल्या. परंतु या दुचाकी जिल्ह्यातील नसल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले. आता जप्त केलेल्या दुचाकी मालकांचा शोध पोलिस घेत आहेत. ही कारवाई पोनि मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण पवार, मनोज परजणे, अशपाक सय्यद, सुशेन पवार, शहेंशाह सय्यद आदींनी केली.
नगरपालिकेतून चोरलेला रिक्षाही जप्त
बीड नगर पालिकेतून रिक्षा चोरी गेल्याची घटना सोमवारी घडली होती. अर्जुन आठवले यांनी तक्रार देताच पोलिसांनी शोध घेऊन रिक्षा चोर संदीपान जानू वाघमारे (३५ रा. कांबी ता. जि. बीड) याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून रिक्षा ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाईही डीबी पथकाने केली.