परळी ( बीड ) : तालुक्यातील बोधेगाव येथील तळ्यात जवळील शेतात उभ्या असलेल्या ऊसास शुक्रवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे आग लागली .या आगीत शिंदे कुटुंबियांचे पंधरा एकर ऊस जळून खाक झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात ऊस साखर कारखान्याने न्यायला हवा होता. परंतु, तीन महिने झाले तरी अद्याप साखर कारखान्याने ऊस नेला नाही. यातच आज अचानक लागलेल्या आगीमुळे शिंदे कुटुंबाचे 12 00 टन उसाचे नुकसान झाले आहे. दुपारी एक वाजता लागलेली आग 5 वाजता आटोक्यात आली.
परळी तालुक्यातील बोधेगाव येथील सोनहीवरा रस्त्यावर असलेल्या तळ्याजवळ बबलू राजाभाऊ शिंदे सुधाकर शिंदे ,बाळासाहेब शिंदे, दशरथ शिंदे यांचे शेत आहे या शेतात पंधरा महिन्यापूर्वी उसाची लागवड केली. नोव्हेंबर महिन्यात ऊस कारखान्यास जाणार होता परंतु वेळेवर ऊस न गेल्याने उभा असलेल्या 15 एकर मधील 1200 टन ऊस शुक्रवारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडला . ही आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी व परळी नगरपालिकेच्या अग्निशमन दल, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. त्यामुळे लगतचा ऊस आगीपासून वाचला आहे. शिंदे यांच्या कुटुंबीयांच्या शेताजवळच आणखी शंभर एकर ऊस उभा आहे.
कार्यक्षेत्रातील साखर कारखाने वेळीच जर ऊसाची वाहतूक केली असती तर शिंदे कुटुंबाचे आज नुकसान झाले नसते, साखर कारखाने उशिरा सुरू केले आहेत. त्यात तीन महिने होऊनही कारखान्याने ऊस नेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाची वाट लागली असल्याचा आरोप बोधेगाव चे माजी सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ज्ञानोबा गडदे यांनी केला आहे, त्यांनी पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.