बीड : कोरोना काळात आरोग्य विभागातील शिपायांपासून ते डॉक्टरांपर्यंत सर्वांनी जीव धोक्यात घालून काम केले. यात आशाताई, अंगणवाडी सेविकांचाही मोलाचा वाटा होता. आजही काही आशाताईंचे कर्तव्य कौतुकास पात्र आहे. पाटोदा तालुक्यातील तांबा राजुरी उपकेंद्रातील एका आशाताईने आपल्या दोन महिन्याच्या तान्हूल्याला मांडीवर घेत ९० लोकांचे आयुष्यमान भारत कार्ड काढले. त्यांच्या या प्रामाणिक कर्तव्याचे स्वागत होत आहे.
दुर्गा माने असे या आशाताईचे नाव आहे. सध्या आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची मोहिम सुरू आहे. तसेच केवायसी करणे, सर्वेक्षण करणे आदी कार्यक्रमही घेतले जात आहेत. यात परिचारीका आणि आशाताईंचाही सहभाग आहे. याच आशाताई सध्या गावातील प्रत्येकाचे कार्ड काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांचे कुटूंबाकडेही दुर्लक्ष होत आहे. असेच काहीसे उदाहरण तांबा राजुरीचे आहे.
पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही आरोग्य केंद्रात अंतर्गत असलेल्या तांबा राजुरी आरोग्य उपकेंद्रात दुर्गा माने या कार्यरत आहेत. बुधवारी या आशाताईंनी आपल्या दोन महिन्याच्या बाळाला दिवसभर मांडीवर घेऊन ९० लोकांचे कार्ड काढले. त्यांच्या या प्रामाणिक सेवेचे आरोग्य विभागाकडून स्वागत होत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उल्हास गंडाळ, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रौफ शेख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एल.आर.तांदळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट, वैद्यकीय अधिकारी डॉ.मयुर शिंदे, समुदाय आरोग्य अधिकारी सुभाष भारती, गट प्रवर्तक साधना शर्मा आदींनी माने यांच्या कर्तव्याचे स्वागत केले आहे.