लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील आष्टी येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण सरवदे यांना निलंबित करण्यात आले आहे. उद्दिष्टापेक्षा कमी वसुली, महावितरणने दिलेल्या फोनवर सर्वसामान्य तसेच लोकप्रतिनिधींशी संवाद न साधणे, वरिष्ठांना वेळेत रीडिंग सादर न करणे या कारणांमुळे कार्यकारी अभियंत्यांच्या आदेशाने शुक्रवारी सरवदे यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली.एप्रिल ते आॅक्टोबर २०१८ या कालावधीत ग्राहकांकडून ७.९ कोटी रुपये वसूली करणे आवश्यक होते. मात्र, ती वसुली झाली नाही. तसेच आॅक्टोबरमध्ये दैनंदिन अहवालानुसार वसुली फक्त ५८.१४ टक्के आहे. ही वसुली जिल्ह्यातील इतर विभागाच्या तुलनेत अतिशय कमी आहे. तसेच तालुक्यातील निर्मिती ब्रिडींग फर्म आंबेवाडी येथील उच्चदाब ग्राहकाच्या रीडिंगबाबत मंडल कार्यालयातून वारंवार मागणी करुन देखील वीज वापरानुसार रीडिंग बिल सरवदे यांनी दिले नाही.महावितरण कंपनीकडून भ्रमणध्वनी दिलेला असताना सरवदे हे कार्यक्षेत्रातील ग्राहकांचे फोन घेत नाहीत. तसेच लोकप्रतिनिधींना कार्यालयीन कामासाठी आले असता भेटत नसल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे आल्या होत्या. त्यामुळे सरवदे यांच्यावर शिस्तभंग कारवाईच्या आधीन राहून निलंबनाची कारवाई करण्यात आली.
महावितरणचे आष्टी उपकार्यकारी अभियंता निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 11:29 PM