बीड : स्वस्त धान्य दुकानाच्या वार्षिक तपासणीचा चांगला अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना आष्टी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार सुभाष कट्टे यांना एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी दुपारी दोन वाजता करण्यात आली.
कट्टे यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच पुरवठा विभागाचा पदभार देण्यात आला होता. त्यांच्याबद्दल तक्रारीही वाढल्या होत्या. तालुक्यातीलच एका स्वस्त धान्य दुकानाचा वार्षिक तपासणीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे चांगला पाठविण्यासाठी कट्टे यांनी दोन हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर एसीबीकडे तक्रार केली. सोमवारी खात्री करुन एसीबीने सापळा लावला. लाच स्वीकारताच कट्टे यांना तहसील कार्यालयातच रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक एस. आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, दादासाहेब केदार, अशोक ठोकळ, विकास मुंडे, अमोल बागलाने, सय्यद नदीम आदींनी केली.
तिसऱ्यांदा ‘एसीबीच्या’ जाळ्यातसुभाष कट्टे हे यापूर्वी दोनदा लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकलेले आहेत. १९९६ व त्यानंतर २०१४ साली बीड तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी असताना त्यांनी लाच मागितली होती. आता तिसऱ्यांदा ते पुन्हा एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.