बीड : आष्टीचे पोलीस निरीक्षक सय्यद शौकत अली सध्या वादग्रस्त ठरत आहेत. नुकतीच त्यांची आपल्या अखत्यारित असलेल्या अधिकाऱ्यांशी बोलतानाचे संभाषण केलेली आॅडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये झालेल्या कारवाईत आरोपींना पाठीशी घालण्याचा उद्देश स्पष्ट दिसून येत आहे. या प्रकरणामुळे पोलीस पुन्हा एकदा वादग्रस्त ठरत आहेत.
खडकत येथील मांसाचा टेम्पो पकडल्यानंतर त्याची आदलाबदल केल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत काहींनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारीही केल्या होत्या. त्यामुळे आष्टी पोलीस वादात सापडले होते. आता त्यात आणखी भर पडली आहे.
पोनि. सय्यद यांनी आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोबाईलवरून केलेले संभाषण व्हायरल झाले आहे. यामध्ये त्यांनी तुम्हाला इतर अवैध धंदे दिसत नाहीत का, इतर कारवाया का करीत नाहीत तसेच लोकप्रतिनिधींना बोलून प्रकरण मॅनेज करा, असे सांगितल्याचे ऐकावयास मिळते. त्यामुळे आत पोनि सय्यद वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
दरम्यान, संभाषण केलेल्या अधिकाऱ्यांनी हा प्रकार आमचा अंतर्गत असल्याचे म्हणत कारवाया झाल्याचे सांगितले आहे. तर पोनि. सय्यद शौकत अली यांनी याबाबत ूबोलण्याचे टाळले.
डीजींकडे तक्रारआष्टी तालुक्यातील खडकत येथे मांसाने भरलेला टेम्पो पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पकडला होता. मात्र यामध्ये पोलिसांनी कारवाईत जप्त केलेला टेम्पो बदलल्याचे समोर आले होते. याबाबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख अॅड.भाऊसाहेब लटपटे यांनी राज्याचे पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली होती. यामध्ये महासंचालकांनी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना इमेल करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.