- अविनाश कदम आष्टी ( बीड) : शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाहीत. त्यात सोमवारी आणि मंगळवारी तालुक्यात अचानक पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्यासमोर दुहेरी संकट आले आहे. अवकाळी पावसाने तालुक्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच एका घरावर वीज कोसळल्याची घटना पुढे आली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कांदा, गहू, संत्रा, लिंबू, डाळींब, आंबा बागेतील काढणीस आलेल्या फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. धामणगाव, मातकुळी, बाळेवाडीसह सात ते आठ गावात वादळ वाऱ्यासह पावसाने सर्वाधिक नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी बांधवाकडून होत आहे.
तालुक्यातील कारखेल बु.येथे आप्पसाहेब तुकाराम साळुंके यांच्या राहत्या घरावर मंगळवारी सकाळी 12 वाजेच्या सुमारास वीज पडली. त्यावेळी सर्व कुटुंब घरामध्ये होते. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पत्नी वच्छलाबाई आप्पासाहेब साळुंखे यांना डोक्याला किरकोळ मार लागला. या परिसरात पहिल्यांदाच राहत्या घरावर वीज पडल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आष्टी तालुक्यातील बाळेवाडीसह काही गावांमधील झालेल्या शेतातील नुकसान झाले त्या भागांची आष्टी तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी पाहणी केली. सोमवारी व मंगळवारी वादळ वाऱ्यासह पाऊस पडल्याने साठ ते आठ गावांतील फळबागासह काही पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी अधिकारी तरटे यांनी दिली. नुकसानीबाबत महसूल आणि कृषीच्या संयुक्त पथकाच्या पाहणीत अधिक समजेल. शेतकऱ्यांनी हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस वादळ वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.
कृषी विभागाचे आवाहनज्या विमा धारक शेतकऱ्यांचे सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी झालेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांनी Crop insurance या ॲप्लिकेशनव्दारे विमा कंपनीला 72 तासांच्या आत तक्रार द्यायची आहे. त्यात नुकसानीचे कारण unseasonable Rain हा पर्याय निवडायचा आहे असे आवाहन तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.