बीड : ऐन जोमात आलेल्या कपाशीच्या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी जेरीस आला. धडपड करुनही बोंडअळी काही केल्या हटत नसल्याने आष्टी तालुक्यातील शेतक-यांनी दहा हजार हेक्टर क्षेत्रातील कपाशी उपटली आहे. बोंडअळीने दहा हजार हेक्टर क्षेत्रावर असलेल्या कपाशीला भक्ष्य केल्याने शेतकरी वैतागले आहेत.
आष्टी तालुक्यातील शेतक-यांनी एकूण २३ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी पिकांची लागवड केली होती. पण अचानक आलेल्या बोंडअळीने नको नको केल्याने कपाशीच्या पिकांची पंचाईत निर्माण झाली आहे. कापसाला हमीभाव नाही, तर दुसरीकडे जोमात आलेल्या कपाशीवर बोंडअळी फिरली. ती नुसती फिरलीच नाही तर तालुक्यातील दहा हजार हेक्टर क्षेत्रातील कपाशी भुईसपाट केले आहे. बोडअळी आटोक्यात येत नसल्याने शेतक-यांनी मजुरांमार्फत कपाशी उपटून टाकली आहे.
आष्टी तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून चांगला पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी दिसत आहेत. चांगले उत्पन्न मिळून देखील हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी कपाशीचे पीक जोमात होते. प्रत्येक झाडाला कैरी देखील भरपुर होती. पिकांची उंची व चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा असतानाच बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाले. बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने तालुक्यातील हजारो शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.याबाबत तालुका कृषी अधिकारी प्रमोद शिंदे म्हणाले की, बोंडअळी पडल्याने उत्पन्न कमी झाले. त्यामुळे शेतकºयांनी कपाशी उपटून शेत मोकळे केले आहे. गहू पेरणीसाठी तयारी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
भरपाईची मागणीकपाशीच्या पिकाला बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी तोट्यात गेला आहे.त्यामुळे राज्य शासनाने सरसकट कपाशी पिकाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय ढोबळे यांनी केली.कपाशी उपटून बहुतांश शेतकरी आता इतर पिके घेण्याच्या तयारीत गुंतले आहेत.