आष्टी : शहरासह तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. असे असतानाही काही नागरिक बेजबाबदारपणे वागत असून, यासोबत काही व्यापाऱ्यांनीदेखील नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून ये आहे. त्यामुळे तहसीलदार, नायब तहीलदार, मुख्याधिकारी, नगरपंचायतीचे कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाने रस्त्यावर उतरून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकावर दंडात्मक कारवाई करत १६ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला.
कोरोना विषाणूपासून बचाव करण्याकरिता नगरपंचायतअंतर्गत विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आष्टी शहरामधील सर्व व्यापारी व छोटे छोटे व्यावसायिक दुकानदार यांनी वेळेत दुकाने बंद करावी तसेच नियमांचे उल्लंघन करू नये, अशा सूचना नगरपंचायतीच्या वतीने देण्यात आल्या होत्या. रविवारी तहसीलदार राजाभाऊ कदम व नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे, मुख्याधिकारी नीता अंधारे,ए. पी. आय. भरत मोरे तसेच नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी शहरातील सार्वजनिक ठिकाणी वावरताना विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींकडून व्यापारी व दुकानदार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत १६ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे नगर पंचायतीचे मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी सांगितले. यावेळी के .टी. सावंत, एस. के. कुलकर्णी, पी. एस. मस्के आदी कर्मचारी सहभागी झाले होते.
प्रशासनाच्या नियमांचे पालन करा
सर्दी, खोकला, ताप आल्यास अंगावर दुखणे न काढता तातडीने उपचार घ्या. कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असल्याने सर्व खबरदारी घ्यावी. सर्दी खोकला ताप आल्यास घरीच अंगावर दुखणे न काढता तत्काळ उपचार घ्यावा. विनामास्क फिरु नये. प्रशासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. - राजाभाऊ कदम, तहसीलदार
विनामास्क दिसाल तर दंडात्मक कारवाई
कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून, कोरोना नियमांचे तंतोतंत पालन न केल्यास विनामास्क व विनाकारण फिरताना दिसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पोलीस प्रशासन ठिकठिकाणी लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे. - भरत मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक
===Photopath===
050421\05bed_4_05042021_14.jpg