५ रुपये शेकडा टक्केवारीने व्याजाने पैसे देऊन व ते परत केल्यानंतरही पुन्हा पैशांची मागणी करत एकाला मारहाण करुन जीपखाली चिरडण्याची धमकी दिल्याची घटना सिरसाळा (ता. परळी) येथे घडली. याप्रकरणी तीन खासगी सावकारांविरोधात १० सप्टेंबर रोजी गुन्हा नोंद झाला.
पाेलिसांच्या माहितीनुसार,
संभाजी रोहिदास आरसुळे (४१) असे मारहाण झालेल्याचे नाव आहे. त्यांनी सोमेश्वर कोडिंबा किरवले, अभिजित सोमेश्वर किरवले आणि साई सोमेश्वर यांच्याकडून ऑक्टोबर २०१७ मध्ये १ लाख २५ हजार रुपये शेकडा ५ रुपये टक्केवारी दराने व्याजाने घेतले होते. आरसुळे यांनी पैसे टप्प्याटप्प्याने परत करुन ही किरवले यांनी तुझ्याकडे ६६ हजार रुपये बाकी असल्याचे त्यांना सांगितले.
दरम्यान, ११ ऑगस्ट रोजी किरवले यांनी ६६ हजार रुपये घेऊन आमच्या फोटो स्टुडिओमध्ये ये असे आरसुळे यांना सांगितले. मुलगा प्रतिकसह आरसुळे त्यांच्या स्टुडिओमध्ये गेले असता आमचे व्याजाचे पैसे का देत नाही असे म्हणून तिघा बापलेकांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या खिशातील २९ हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून घेतला. शिवाय, जीपखाली चिरडून टाकू अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी १० सप्टेंबर राेजी संभाजी आरसुळे यांनी सिरसाळा ठाण्यात तक्रार दिली. यावरून सोमश्वर किरवले, अभिजित किरवले आणि साई किरवले यांच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक पी.डी. शेळके हे करत आहेत.