- नितीन कांबळेकडा- नवप्रविष्ट पोलिस शिपायाने मुंबईवरून गावी येऊन नातेसंबंधातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना प्राॅमिस 'डे' च्या दिवशी घडली होती. या आरोपी पोलिस शिपाई फरार असून त्याला मदत करणाऱ्या दोन मित्रांना पोलिसांनी वेशांतर करून मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले.
आष्टी तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेसंबंधातील एका नवप्रविष्ट पोलिस शिपायाने ११ फेब्रुवारी रोजी गावी येऊन अत्याचार केला होता. यात गावातील दोन मित्रांनी त्याला मदत केली होती. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात १५ फेब्रुवारी रोजी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी पोलिस शिपाई फरार होता.
दरम्यान, मंगळवारी पिंक पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक धरनीधर कोळेकर यांच्या पथकाने वेशांतर करत थेट उसाचा फड गाठला. येथे आरोपी पोलिस शिपायाला गुन्ह्यात मदत करणारे टॅक्टरवर चालक समीर खेडकर आणि गॅरेजवर काम करणारा हरिओम खेडकर यांच्या मुसक्या आवळल्या. तर मुख्य आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
ही कारवाई पिंक पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक धरनीधर कोळेकर, पोलीस हवालदार शरद टेकाळे,मुद्दशर शेख,नितीन साप्ते यांनी केली. भावनेला बळी न पडता चुकीच्या गोष्टीचे समर्थन अथवा त्यात मदत करू नये, अन्यथा पॉस्कोसारखे गंभीर गुन्हे दाखल होऊन अटक होण्याची वेळ येवू शकते, असे पिंक पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक धरनीधर कोळेकर यांनी केले आहे.