बीड : शाळेतील किरकोळ वादातून मुख्याध्यापकावर बतईने हल्ला करून जखमी करणाऱ्या दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गुरूजींचे गैरवर्तन लक्षात घेत जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने कार्यवाही करीत गेवराई तालुक्यातील शेकटा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संतोष गिरी व रघुनाथ नागरगोजे यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
गेवराई तालुक्यातील शेकटा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अंबादास मल्हारी नारायणकर (वय ५३, रा. विश्वासनगर, बीड) यांच्यासह सहशिक्षक घाडके, रघुनाथ नागरगोजे, लक्ष्मण परजणे, संतोष गिरी हे बीडवरून शाळेत दररोज एकाच गाडीतून जातात. १२ मार्च रोजी त्यांच्यात वाद झाल्यानंतर मुख्याध्यापक नारायणकर यांच्यावर बतईने हल्ला करण्यात आला होता.
जिल्हा परिषद शिक्षकांनी धिंगाणा करून गैरवर्तन केल्याने त्यांची कृती जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियमांचा भंग करणारी असल्याने विभागीय चौकशी करण्यासाठी सद्यस्थितीत पदावरून दूर करण्यासाठी संतोष गिरी व रघुनाथ नागरगोजे यांना जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील कलम ३( २) मधील तरतुदीनुसार निलंबित करण्याचे आदेश सीईओ संगितादेवी पाटील यांनी दिले.