- नितीन कांबळे कडा ( बीड ) आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील एक उच्चशिक्षित युवक समीर शेख हा मागील सात वर्षांपासून अनोख्या पद्धतीने शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहे. तो शिवनेरीवरुन २०० किलोमीटर दूर गावात पायी शिवज्योत घेऊन येतो. जातीपातीचे बंधन तोडून सामाजिक सलोख्याचा संदेश देण्याच्या त्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
समीर शेख या उच्चशिक्षित तरुणाची शिवाजी महाराजांवर निस्सीम श्रद्धा आहे. शिवाजी महाराजांच्या कार्याचा जागर करून त्यांचा सामाजिक सलोख्याचा संदेश दृढ करण्याच्या उद्देशाने मागील ७ वर्षांपासून समीर शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करत आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर असलेली शिवज्योत तो दरवर्षी शिवनेरी येथून बीड जिल्ह्यातील सावंगी पाटण या गावी पायी घेऊन जातो. या जयंतीला सुद्धा तो शिवनेरी येथून एकदिवस आणि एका रात्रीचा न थकता प्रवास करून गावी पोहचला आहे. यावेळी त्याच्यासोबत गावातील अजय मरकड, राघव खिलारे, अमीत गवारे, अनंत खिलारे, अजय वाघमारे, सुमीत भगत, शिवराम खिलारे, अमोल खिलारे, कृष्णा भोसले, शुभम भोसले, रोहीत भोसले, रोहीत मरकड, अकुंश फुलमाळी, अक्षय खिलारे, हरि खिलारे, तुषार खिलारे, हरी भोसले यांच्यासह ५० मावळे सोबत होते.
शिवराय महाराष्ट्रातील सर्वांचे दैवत शिवरायांचे विचार कायम माझ्या मनात असतात. ते माझे दैवत आहे. सात वर्षापासून गावातील तरुणांसोबत शिवनेरीवरून पायी शिवज्योत घेऊन येतो. शिवनेरीवर गेल्यावर मुस्लिम मावळा आहे समजताच मला तेथे खूप मानसन्मान दिला जातो. आमची सर्व व्यवस्था करण्यात येते. शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवज्योत गावात आणण्याचा मला मान मिळतो याचा मला गर्व असून हे कार्य अविरत सुरु राहील.