परळी (बीड ) : शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर जवळील जिल्हा परिषद हायस्कुल शाळेच्या मोकळ्या ग्राऊंडमध्ये आणिबाणीच्या आगोदर दुष्काळी परिषद माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली होती. यासोबतच १९८० मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या रेणापूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा सभेसाठी सुद्धा वाजपेयी परळीत आले होते. या दोन्ही सभेच्या आठवणी परळीकरांच्या मनात आजही ताज्या आहेत.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आज सायंकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने अवघे परळीत दुःखाचे वातावरण आहे. यानिमित्ताने परळीतील जुने भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांनी अटलजींच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. अटलजी पहिल्यांदा परळीत आले ते आणीबाणीच्या आधी दुष्काळ परिषदेसाठी. यानंतर ते आले गोपीनाथ मुंडे यांच्या रेणापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारार्थ. ही सभा झाली होती वैद्यनाथ महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात. सभेनंतर अटलजी यांनी व्यासपीठावरुन खाली येऊन गोपीनाथ मुंडे यांच्या आईचे दर्शन घेतले होते. अशी आठवण त्या सभेचे सुत्रसंचलन करणारे भाजप नेते दत्ताप्पा ईटके यांनी सांगितली. यासोबतच भाजप जेष्ट नेते विकास डुबे यांनी या सभेत अटलजींनी मराठीत भाषणाला सुरुवात केली होती अशी आठवण सांगितली. मंडीमे माल बहुत था ।मगर खरेंदीदार नही था । चाहे तो वोट खरेदी कर सकता था । लेकीन वोट खरेदी कर ।सरकार नही बना ना था । अशा ओळींची आपल्या भाषणात अटलजींनी पेरणी केल्याची आठवण भाजयुमोचे तत्कालीन शहराध्यक्ष राजेंद्र ओझा यांनी सांगितले.