माजलगाव : ऊसतोडणी करून उपजीविका करणाऱ्या २० वर्षीय तरुण महिलेवर गळ्यावर चाकू ठेवून टोळीप्रमुखाकडून अत्याचार करण्यात आला. ही घटना तालुक्यातील तालखेड (खेर्डा) येथे सोमवारी घडली. दरम्यान, पीडितेच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील खेर्डा येथे ऊसतोड करणाऱ्या वीस वर्षीय तरुण महिलेच्या राहत्या कोपीत टोळीप्रमुख छगन आवचार हा अत्याचार करण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने घुसला. यावेळी त्याने या महिलेला शिवीगाळ करत तिच्या गळ्याला चाकू लावून जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, यावेळी त्याने कोपीबाहेर उभा असलेला आपला साथीदार करण क्षीरसागर याला आत बोलावले. यावेळी तालखेडचा रहिवासी करण क्षीरसागर याने एका तासाच्या फरकात महिलेवर दोन वेळा अत्याचार केला. यावेळी छगन आवचार कोपीबाहेर उभा होता. ही घटना सोमवारी संध्याकाळी सहा-साडेसहा वाजता घडली. दरम्यान, पीडित महिलेच्या फिर्यादीवरून टोळीप्रमुख छगन आवचार व करण क्षीरसागर या दोघांविरोधात ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून तपास पोलीस उपाधीक्षक सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोमनाथ नरके करत आहेत.