अंबाजोगाई : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी शेख सिराज शेख मुन्शी यास (रा.मियाभाई कॉलनी, अंबाजोगाई) पाच वर्षे सक्तमजुरी व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा तिसरे जिल्हा व सत्र न्या. एम. बी. पटवारी यांनी गुरुवारी सुनावली. दंडाची रक्कम पीडितेस देण्याचा व शिक्षा एकत्र भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिला.
९ वर्षीय पीडित मुलगी ही वही आणण्यासाठी शेख सिराज शेख मुन्शी याच्या किराणा दुकानावर गेली असता त्यावेळी दुकान बंद असल्याने मालक शेख सिराज शेख मुन्शी याने पीडितेस दुसऱ्या दरवाज्यातून आत येण्यास व वही घेण्यास सांगितले. त्यावेळी मुलगी वही घेत असता आरोपीने लैंगिक भावनेने पीडित मुलीस पाठीमागून धरले व तिच्या छातीवर व मांडीवर हात फिरवून तिचा विनयभंग केला व लैंगिक अत्याचार केला. त्यावेळी कोणीतरी गिऱ्हाईक आले म्हणून आरोपीने मुलीस सोडून दिले. त्यानंतर ही घटना मुलीने मावशी व आजीला सांगितली. तिचे आईने फिर्याद दिल्यावरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात बलात्कार, विनयभंग, अजाज अप्रका, व पोस्को कायद्यानुसार प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता. तत्कालीन उपविभागीय अधिकारी विशाल आनंद यांनी तपासानंतर दोषारोपपत्र प्रकरण सुनावणी साठी सत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणाची सुनावणी झाली असता फिर्यादी पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकिलाचा युक्तिवाद ऐकून आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपी शेख सिराज पिता शेख मुन्शी यास कलम ३५४ अनवये पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, कलम ७, ८ बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा अन्वये ५ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड व ३(१)(डब्लू)(आय) १ वर्षे सक्तमजुरी व ५००० रुपये दंड अशी शिक्षा न्या. एम. बी. पटवारी यांनी सुनावली.
फिर्यादीतर्फे सरकारी वकील ॲड. रामेश्वर मन्मथअप्पा ढेले यांनी ज्येष्ठ सरकारी वकील ॲड.अशोक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिले. पैरवीचे कामकाज पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चौधरी यांनी पाहिले.