बीड : कोपर्डी घटनेतील नराधमांना न्यायालयाच्या आवारातच चोप देणारे अमोल खुने यांच्यावर अज्ञात तीन ते चार जणांनी भ्याड हल्ला केला. यामध्ये खुने हे गंभीर जखमी झाले असून त्यांना गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना गेवराई तालुक्यातील अर्धमसला फाट्यावर सोमवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी रात्री ११ वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान, खुने हे मनोज जरांगे यांचे सहकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. गेवराई तालुक्यातील धानोरा येथील अमोल खुने हे रहिवासी आहेत. ते मराठा आंदोलनात सक्रिय आहेत. तसेच कोपर्डी घटनेतील नराधमांवर न्यायालयाच्या आवारात हल्ला करणाऱ्यांमध्येही खुने यांचा सहभाग होता. सोमवारी ते गेवराई येथे भाचीला सोडून परत आपल्या धानोरा या गावी दुचाकीवरून जात असताना गढी-माजलगाव महामार्गावरील अर्धमसला फाट्यावर अज्ञात तीन ते चार आरोपींनी अचानक त्यांच्यावर दगडफेक सुरु केली. यामध्ये खुने यांच्या डोक्याला दगड लागल्याने त्यांना गंभीर इजा झाली.
घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून खुने यांना उपचारासाठी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भ्याड हल्ल्याची माहिती मिळताच मराठा समाज बांधवांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. तसेच हल्याचे कारणही अद्याप समोर आलेले नाही.
अमोल खुने नामक व्यक्तिवर हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना तलवाडा पोलिस ठाणे हद्दीत घडली. परंतू गेवराईच्या रूग्णालयातआणल्याचे समजले असून आमचे अधिकारी, कर्मचारी तिकडे गेले आहेत. सर्व माहिती घेऊन मग गुन्हा दाखल केला जाईल. प्रवीणकुमार बांगर, पोलिस निरीक्षक, गेवराई