लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पाटोदा तालुक्यात वांजरा फाटा येथी घुले दाम्पत्यावर हल्ला करून हजारोंचा ऐवज लंपास केल्याच्या गुन्ह्यात सहा जणांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ती सख्या भावंडांसह चौघे ताब्यात घेतले असून अन्य दोघांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. अवघ्या १२ तासात या गुन्ह्याचा तपास लावून चार दरोडेखोरांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
घुले वस्तीवर दिलीप घुले, सखुबाई घुले हे दाम्पत्य आपल्या दोन मुलांसह राहतात. ८ जानेवारी रोजी जेवण करून ते झोपले. रात्री साडेबाराच्या सुमारास अज्ञात सहा दरोडेखोरांनी दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडताच एकाने दिलीप घुले यांचे तोंड दाबून जवळीलच लोखंडी पासाने मारहाण केली. हा आवाज ऐकून त्यांची पत्नी सखूबाई उठल्या. त्यांनाही मारहाण केली. यामध्ये दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून सखूबार्इंच्या अंगावरी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ४३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. घाबरलेल्या मुलांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील लोक धावून आले.
पोलिसांनीही धाव घेत पंचनामा करून तपासाची चक्रे गतीने फिरविली. हे दरोडेखोर जवळील जामखेड तालुक्यातील असल्याचे समजले. त्यांनी तात्काळ धाव घेत मोहा येथून तीन भावंडांसह एकाला बेड्या ठोकल्या.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक डॉ. अभिजित पाटील, पो. नि. घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे सपोनि श्रीकांत उबाळे, प्रकाश वक्ते, बबन राठोड, संजय खताळ, गणेश दुधाळ, संघर्ष गोरे, अशोक दुबाले, माया साबळे, नारायण साबळे यांनी केली.