बीड : शिवसेना उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप यांच्यावर हल्ला करणाऱ्या चार आरोपींना अगोदरच पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. आता शिवसेनेचाच कट्टर कार्यकर्ता असलेल्या बाळासाहेब गुंजाळ या पाचव्या आरोपीलाही सोलापूरमधून स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री बेड्या ठोकल्या. गुंजाळ हा काकु-नाना विकास आघाडीच्या नगरसेविका अश्विनी गुंजाळ यांचा पती आहे.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख हनुमंत जगताप (रा. भवानवाडी, ता. बीड) यांच्यावर गावाकडून बीडला येताना ३० ऑगस्ट रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. त्यानंतर ३ सप्टेंबर रोजी दत्ता जाधव व इश्वर देवकर (रा. पेठ बीड) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. प्रकरण गंभीर असल्याने याचा तपास पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांच्याकडे साेपविण्यात आला. त्यानंतर पुन्हा बाबुलाल पवार, अंबादास विटकर (दोघेही रा. पेठ बीड) या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले होते. या प्रकरणात आणखी हल्लेखोर असण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू असताना शिवसेनेचाच कट्टर कार्यकर्ता बाळासाहेब गुंजाळ याचे नाव समोर आले. त्याच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखेसह पिंपळनेर पोलीस होते. सोमवारी रात्री गुंजाळ हा एका हॉटेलवर जेवत असल्याची माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने त्याला बेड्या ठोकल्या. बीडमध्ये आणल्यावर त्याला उपअधीक्षक वाळके यांच्या स्वाधीन केले. मंगळवारी न्यायालयात हजर केल्यावर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
शिवसेनेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर
बाळासाहेब गुंजाळ याची पत्नी अश्विनी गुंजाळ या काकु-नाना विकास आघाडीच्या चिन्हावर निवडून आलेल्या आहेत. बाळासाहेब गुंजाळही आ. संदीप क्षीरसागर यांचा कट्टर कार्यकर्ता होता. परंतु काही दिवसांपूर्वीच त्याने आ. क्षीरसागरांना सोडचिठ्ठी देत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताफ्यात प्रवेश केला. शिवसेनेत येताच त्याने उपजिल्हाप्रमुखावर हल्ला केला आहे. हल्ल्याचे कारण अद्याप समोर आलेले नसले तरी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
--
बाळासाहेब गुंजाळ याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यावर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता अटक आरोपींची संख्या ५ झाली आहे. अजूनही तपास सुरूच आहे.
संतोष वाळके, पोलीस उपअधीक्षक, बीड