परळी ( बीड ): तेलंगणातील करिमपुर येथील दहा पोलीस अधिकारी, कर्मचार्यांचे पथक परळीतील इराणी गल्लीत तीन ते चार आरोपींना एका गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी सोमवारी सकाळी १० वाजता आले होते. पोलिसांनी आरोपींना हातकड्याही घातल्या. मात्र याचवेळी या भागातील महिलांसह इतर नागरिकांनी तेलंगणा पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. त्यानंतर आरोपी हातकडीसह फरार झाले. दरम्यान, तेलंगणा पोलिसांन स्थानिक पोलिसांची कसलीच मदत घेतली नाही. हल्ला झाल्यानंतर पोलीस अधिक्षकांना फोनवरून माहिती दिली. पोलिसांवरच हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.
येथील इराणी गल्लीतील चार आरोपींना एका गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी सोमवारी सकाळी तेलंगणा राज्यातील करिमपुर येथील पोलीस निरीक्षकासह दहा कर्मचार्यांचे पथक परळीत दाखल झाले होते. या पथकाने इराणी गल्लीत सापळा रचत दोन आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. मात्र याचवेळी या भागातील लोकांनी पोलिसांवर दगडफेक करत हल्ला चढवला. याच दरम्यान ताब्यात घेतलेले आरोपीही पोलिसांच्या तावडीतून फरार झाले. दरम्यान हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेमुळे परळी शहरात खळबळ उडाली आहे. अद्याप या प्रकरणाची नोंद झालेली नाही.
स्थानिक पोलिसांना का डावलले?परराज्यातून आलेले पोलिसांची प्रत्येक पथके आगोदर पोलीस अधीक्षक किंवा जवळील पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्यांची मदत घेतात. परंतु या प्रकरणात तेलंगणा पोलिसांनी स्थानिक पोलिसांची मदत घेतली नाही. परळी पोलिसांना कसलीच कल्पना न देता इराणी गल्लीत गेले. हीच घाई त्यांच्या अंगलट आली. यामध्ये आरोपी तर पळालेच, परंतु हल्लाही सहन करावा लागला. त्यांनी स्थानिक पोलिसांना डावल्याचा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
चौकशी सुरू आहेतेलंगणा पोलिसांनी आम्हाला कसलीच माहिती न देता आरोपींना पकडण्यास गेले. तेथे काहीतरी वाद झाला. त्यानंतर आम्ही तात्काळ आमचे पोलीस अधिकारी, कर्मचारी पाठविले. अद्याप या प्रकरणाची नोंद झालेली नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. लवकरच खरी परिस्थिती समोर येईल.- अजित बो-हाडे, अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई