बीड : जिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करणारा तांब्याचा पाईप तोडण्याचा प्रयत्न करणारा चोरटा बिनधास्त फिरत असल्याचे समोर आले आहे. ऑक्सिजन बंद करून ३५ रूग्णांच्या जीवाशी खेळूनही आरोग्य विभागाने या चोरट्याविरोधात सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नव्हती. त्यामुळे आता जिल्हा शल्य चिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याच कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. यामुळे सामान्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.
जिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक ७, ८ व ९ मध्ये ऑक्सिजन पुरवठा करणारा तांब्याचा पाईप तोडून चोरण्याचा प्रयत्न एका दारूड्याने केला होता. वेळीच हा प्रकार निदर्शनास आल्याने चोरट्याला पकडण्यात आले. शिवाय या तीन वॉर्डमधील ऑक्सिजनवर असणारे ३५ रूग्णांचा जीवही सुरक्षित राहिला. सुदैवाने ही दुर्घटना टळल्यानंतर या चोरट्याविरोधात कडक कारवाई होणे अपेक्षित होते. परंतू चार दिवस उलटूनही सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत बीड शहर ठाण्यात कसलीच नोंद झालेली नव्हती. त्यामुळे हा चोरटा अद्यापही मोकाट असून काहीही केले तर कारवाई होत नाही, असा समज त्याचा झाल्याची चर्चा आहे. या प्रकाराबद्दल आरोग्य विभाग मुग गिळून गप्प असून अधिकाऱ्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गित्तेंच्या पावलावर साबळेंचे पाऊलयापूर्वी एका दारूड्याने ऑक्सिजन पुरवठा बंद केला होता. तेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.सूर्यकांत गित्ते कर्तव्यावर होते. तेव्हाही काहीच कारवाई झालेली नव्हती. आता त्यापेक्षाही गंभीर प्रकार घडला. चोरटाही सापडला. परंतू चार दिवस उलटूनही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे व त्यांच्या पथकाने कसलीच कारवाई केली नाही. त्यामुळे साबळेंचेही त्याच पावलावर पाऊल पडत असल्याची चर्चा होत आहे.
साबळेंच्या आदेशाला केराची टोपलीसीएस साबळे यांनी पदभार स्विकारल्यानंतर काही दिवस आपली छाप पाडली. परंतू ती हळूहळू कमी होत असल्याचे दिसत आहे. डॉक्टर कामचुकारपा करणार नाहीत, असा दावा त्यांनी केला होता. परंतू आठवड्यापूर्वीच एका राऊंडमध्ये तब्बल १० डॉक्टरांनी हलगर्जी केल्याचे दिसले. त्यांना केवळ नोटीसांचा पाहुणचार केला. आता या प्रकराणातही त्यांनी वारंवार कनिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुचना करूनही त्यांचे कोणीच ऐकलेले नाही. त्यामुळे त्यांचा वचक कमी होत चालल्याचे दिसत असून त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचे दिसते.
गुन्हा दाखल करण्याचे पुन्हा आदेश ऑक्सिजन पाईप तोडल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मी स्वत: पत्र दिले आहे. तसेच पोलिसांनाही बोललो असून एसीएसलाही सांगितले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पुन्हा आदेश दिले आहेत.- डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड