लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शाळेत जाणा-या आठवीच्या वर्गातील विद्यार्थिनीला दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तीने दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु ही बाब वेळीच मुलीच्या लक्षात आल्याने तिने त्यांच्यापासून पळ काढत वसतिगृह गाठले. ही घटना मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास माने कॉम्प्लेक्स परिसरात घडली.
प्रकरणी समाजकल्याण अधिका-यांसह मुलगी व तिचे आई-वडील यांनी शिवाजीनगर ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची चौकशी सुरू होती. या घटनेने शहरातील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सुनीता (नाव बदलले आहे) ही सामाजिक न्याय विभागाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ असलेल्या मुलींच्या वसतिगृहात राहते. शहरातील भगवान विद्यालयात ती इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेते. रोज ती शाळेत सायकलवरून जात असे. परंतु मंगळवारी तिची सायकल खराब झाली होती. त्यामुळे ती पायी निघाली होती. माने कॉम्प्लेक्स परिसरात आल्यावर तिला दुचाकीवरून आलेल्या जोडप्याने ‘तुला शाळेत सोडतो’ असे म्हणत दुचाकीवर बसण्यास सांगितले. परंतु अनोळखी असल्याने मुलीने दुचाकीवर बसण्यास नकार देत पुढे निघून गेली. परंतु या जोडप्याने तिचा पाठलाग केला. तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न करताच सुनीताने आरडाओरडा करीत वसतिगृहाकडे पळ काढला.
वसतिगृहात आल्यावर महिला अधीक्षकांना हा प्रकार सांगितला. त्यांनी तात्काळ सुनीताच्या आई-वडिलांना बोलावून घेतले. ही माहिती तात्काळ वरिष्ठांना न देता दडपून ठेवण्याचा प्रयत्न अधीक्षकांकडून करण्यात आला होता. परंतु काही लोकांना याची माहिती समजली आणि त्यांनी सहायक आयुक्तांच्या कानावर घातली. त्यांनी तात्काळ माहिती घेत कारवाईचे आदेश दिले.
त्यानंतर सकाळी घडलेल्या घटनेची तक्रार देण्यासाठी सायंकाळी सहा वाजले. त्यामुळे वसतिगृह अधीक्षकांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणाची तात्काळ चौकशी करून आरोपींना अटक करावी तसेच वसतिगृहाच्या सुरक्षिततेबद्दल प्रशासनाने काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे.पोलिसांकडून चौकशीला सुरुवाततक्रार अर्ज प्राप्त होताच पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी सहायक पोलीस निरीक्षक देवकर यांना प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्याप्रमाणे देवकरांसह त्यांची टीम रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची चौकशी करीत होती. मुलीलाही विश्वासात घेऊन तिच्याकडून काही धागादोरा मिळतोय का, याबाबत विचारपूस करीत होते.
सुरक्षितता ऐरणीवरमागील काही दिवसांपासून छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हाच धागा पकडून पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी शहरासह प्रत्येक तालुक्यात दामिनी पथकांची नियुक्ती केली. त्यामुळे काही प्रमाणात मुलींच्या मनातील भीती दूर झाली आहे. परंतु मंगळवारी सकाळी अपहरण करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.प्रत्येकवेळी पोलिसांवरच अवलंबून न राहता नागरिकांनीही स्वत:हून काळजी घेणे गरजेचे आहे. त्यानंतरच अशा घटनांना आळा बसेल.आयुक्त ठाण्यात दाखलही घटना समजताच सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी वसतिगृहात धाव घेत मुलीची विचारपूस केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ते स्वत: मुलीला घेऊन शिवाजीनगर ठाण्यात गेले. येथे त्यांनी रीतसर अर्ज केला. पोलिसांनी हा अर्ज चौकशीवर ठेवला आहे.अर्ज आला आहे. प्रकरणाच्या चौकशीसाठी अधिकारी, कर्मचारी पाठविले आहेत. तपासणी, चौकशी करून तात्काळ पुढील कारवाई केली जाईल.- नानासाहेब लाकाळ,पोनि. शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीडप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ धाव घेतली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चौकशी करून गुन्हा दाखल करू, असे पोलिसांनी सांगितले आहे. -डॉ.सचिन मडावीसहायक आयुक्त, समाजकल्याण, बीड