बीड : बनावट रेमडेसिविर तयार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात असलेली १६ प्रकारची औषधे व रेमडेसिविर इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्या एका व्यक्तीकडे मिळून आल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास हजारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गांधीनगर पेठ बीड भागात केली.
शेख अख्तर शेख रशीद (रा. गांधीनगर चानकनगर, पेठबीड, बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट रेमडिसीवीर तयार करण्यासाठी शेख अख्तर शेख रशीद याने रेमडेसिविरच्या रिकाम्या बाटल्यांचा साटा केला आहे. तसेच शासकीय वापरासाठी असलेली १६ प्रकारची औषधे त्याच्याकडे आहेत, तो बनावट इंजेक्शन तयार करून विक्री करणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पथकाला मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक विलास हाजारे, पो.कॉ.संभाजी भिल्लारे, बालाजी बासेवाड, विशाल खाकरे यांनी पेठ बीड भागातील अचानक नगर गांधीनगर येथे छापा टाकला. यावेळी आरोपी शेख अख्तर याच्या खोलीत १९ हजार ६६ रुपयांचे शासकीय वापरासाठी असलेली औषधे मिळून आली. रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटल्या देखील आढळून आल्याची सूत्रांची माहिती आहे. तो सर्व साठा जप्त करून याची माहिती औषध प्रशासन विभागास देण्यात आली. त्यांनंतर औषध निरिक्षक रामेश्वर बाबुराव डोईफोडे यांच्या फिर्यादीवरून शेख अख्तार याच्याविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.