लोकमत न्यूज नेटवर्क
केज : तालुक्यातील लाडेगाव येथील गायरान धारकांनी केज तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने गायरानधारकांनी सामूहिक आत्मदहन आंदोलन मागे घेतले.
केज तालुक्यातील लाडेगाव येथे मागासवर्गीय भूमिहीन गायरानधारकांचे सर्व्हे नं.१४३ वहिती करून आपली उपजीविका भागवत आलेले आहेत. सदर अतिक्रमण हे अनेक वर्षांपासून होते. २९ डिसेंबर २०२० रोजी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार केजच्या महसूल विभागाने पोलीस बंदोबस्तात हे या जमिनीवरील अतिक्रमण हटविले; परंतु सदर गायरानाच्या चारही बाजूने असलेल्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन कोरून अतिक्रमण केले आहे. ते हटवावे. सर्व्हे नं.१४३ मधील जमिनीच्या चारही बाजूच्या हद्दी निश्चित करण्यात याव्यात, अशी मागणी गायरानधारकांनी तहसीलदारांकडे केली होती. याची दखल न घेतल्याने हे आंदोलन करण्यात आले.
....
तहसीलदारांनी स्वीकारले निवेदन
गायरानधारकांनी ९ जुलैला सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान केज तहसील कार्यालयासमोर लाडेगाव येथील मागासवर्गीय लोकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून पुढील अनर्थ टाळला. केजचे तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी या गायरानधारकांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या मागणीचे निवेदन स्वीकारले.