लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाडळशिंगीजवळील गतिरोधकावर शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास अज्ञात तीन ते चार जणांनी उस्मानाबाद येथून औरंगाबादकडे जात असलेल्या एका कारला अडवून चालकाला मारहाण केली, तर अन्य एक ते दोन लहान गाड्यांना रोखण्याचा प्रयत्न झाल्याचे समजते.
गेवराई पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले होते. पाडळसिंगीजवळ काही वर्षापूर्वी गतिरोधक बसविलेले आहेत. शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन ते चार चोरट्यांनी गतिरोधकाचा फायदा घेत वाशी (जि. उस्मानाबाद) येथील एक कार औरंगाबादकडे जाताना चालकाला रोखून धरपकड केली. यामध्ये चालक जखमी झाला. यानंतर गाडीतील तीन महिलांनी आरडाओरडा केला. यानंतर चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
ही माहिती गेवराई पोलिसांना समजल्यावर उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, ठाण्याचे पो.नि. निरिक्षक दिनेश आहेर हे घटनास्थळी दाखल झाले होते.शुक्रवारी पहाटे हा प्रकार झाल्याने या घटनेतील अज्ञात चोरटे पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. या प्रकरणी शुक्रवारी उशिरापर्यंत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला नव्हता. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर पोलीस गस्त वाढवणे गरजेचे झाले आहे.