अंबाजोगाई - जमिनीचे बनावट दस्तावेज आणि चुकीचा मोजणी नकाशा तयार करून ८६ वर्षीय वृद्धाची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून सहा जणांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपीत अंबाजोगाई येथील भूमी अभिलेख अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
वसंत धोंडीबा भावठणकर (वय ८६, रा. हाऊसिंग सोसायटी, अंबाजोगाई) यांच्या फिर्यादीनुसार, शहरातील गट क्र. ४७३ मध्ये त्यांच्या मालकीची १ हेक्टर ३१ गुंठे जमीन आहे. सदर जमिनीच्या उत्तरेकडे शेजारी असलेली जमीन शंकरराव सटवा जाधव यांच्या मालकीची असून त्यांनी त्याची १९८८ साली विक्री केली. सध्या भावठणकर यांच्या उत्तरेकडे शंकरराव जाधव यांची कसल्याची प्रकारची जमीन नाही. त्यानंतर शंकर जाधव यांचे एकमेव वारस असल्याचे भासवून भीमराव शंकरराव जाधव आणि पद्मीनबाई भीमराव जाधव यांनी चुकीच्या नोंदी आधारे पूर्वीच विकलेल्या जमिनीच्या चतुःसीमा टाकून हमीद सुलेमान गवळी आणि शेख निसार पाशामीर शाह शेख यांना बोगस खरेदीखत करून दिले.
तसेच, या चौघांनी भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक राजेश लोंढे आणि उपअधीक्षक मनोज संधान यांच्याशी संगनमत करून खोटा, बनावटी मोजणी नकाशा तयार केला व भावठणकर यांची जमीन स्वतःची असल्याचे भासवून त्यांना जमिनीवरून बेदखल करण्याचा प्रयत्न केला. याबाबत वसंत भावठणकर यांचे नातू अभिजीत यांनी बीडच्या भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक कार्यालयात तक्रार केल्यानंतर त्यांनी सदरील नकाशा रद्द केला असे फिर्यादीत नमूद आहे. सदर फिर्यादीवरून हमीद सुलेमान गवळी, शेख निसार पाशामीर शाह शेख, भीमराव शंकरराव जाधव, पद्मीनबाई भीमराव जाधव, मनोज संधान आणि राजेश लोंढे या सहा जणांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात कलम ४६८, ४६९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.कॉ. सोनेराव बोडखे करत आहेत.
अंबाजोगाईत जमीन हडपण्याचे प्रकार वाढलेअंबाजोगाई शहर आणि आसपासच्या परिसरातील जमिनीचे भाव दिवसागणिक प्रचंड वाढत आहेत. त्यामुळे भूमाफिया आणि गावगुंडांनी बनावट दस्तावेज करून जमिनी बळकावण्याचा सपाटा लावला आहे. गुंडागर्दी करून, धमकावून, वेळप्रसंगी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून जमिनीवर कब्जा करण्याचे प्रयत्न होत आहेत. वेळीच या गुंडांना आवरले नाही तर शांत आणि वास्तव्यासाठी सुरक्षित अशी अंबाजोगाईची असलेली ओळख धूसर होण्याची शक्यता आहे.