बीड : कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा सुरू झाल्या आहेत. शासन अध्यादेशानुसार सर्व माध्यमाच्या शाळेतील इयत्ता ५ वी ते ८ वी चे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू झाले आहेत. बीड जिल्हयातील एकूण १३६३ शाळांतील वर्गापैकी ८७१ वर्ग सुरू झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेचे ७३७ पैकी ५३६ वर्ग तर खासगी शाळेचे ६२६ पैकी ३३५ शाळांतील वर्ग सुरू झाले आहेत, अशी माहिती बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बीड जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळेतील इयत्ता ५ वी ते ८ वीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे ५ वी ते ८ वीचे वर्ग असलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ५४ हजार १४७ असून २८ जानेवारीला ११ हजार १४८ एवढी विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. खासगी शाळेची विद्यार्थीसंख्या १ लाख ३१ हजर ६८८ असून १३ हजार ४४२ विद्यार्थी उपस्थित होते.
शासन मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड-१९ संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून वर्ग सुरू करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहे. शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. पालकांच्या सहमतीने विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासंदर्भात शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांना आदेश देण्यात आले आहेत.
-----