बीड : येथील क्षयरोग कार्यालयातील डॉक्टरांनी रुग्णांना वाऱ्यावर सोडत दांडी मारली होती. त्यामुळे आलेल्या रुग्णांवर कर्मचारीच उपचार करत असल्याचा प्रकार 'लोकमत'ने स्टींग ऑपरेशनद्वारे उघड केला होता. आता या दांडीबहाद्दर डॉक्टरला नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस बजावताच शनिवारी सकाळीच डॉक्टरने ओपीडीत हजेरी लावली.
जिल्ह्यात क्षयरोग्यांची शोध माेहीम हाती घेतली जाते. रुग्ण शोधल्यावर सरकारी व खासगी डॉक्टरांचा सन्मानही केला जातो. परंतु खुद्द कार्यालयातच सर्व सावळागोंधळ आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश शिंदे हे ओपीडीत बसतच नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी 'लोकमत'ने स्टिंग केले. यात डॉक्टर तर गैरहजर होतेच, परंतु धक्कादायक म्हणजे कर्मचारीच उपचार करत असल्याचे उघड झाले होते. याबाबत समजताच जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जयवंत मोरे यांनी डॉ. शिंदे यांना नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. नोटीस बजावताच शनिवारी सकाळीच डॉ. शिंदे ओपीडीत बसले. यामुळे रुग्णांनी समाधान व्यक्त केले. यात सातत्य राहील, यासाठी वरिष्ठांनीही लक्ष देण्याची गरज आहे.
--
कारवाईपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल
'लोकमत'ने स्टिंग केल्याचे समजताच डॉ. माेरे यांनी डॉ. शिंदे यांना संपर्क केला. गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे खासगी प्रॅक्टिस करत असल्याने त्यांनी लगेच उमापूर आरोग्य केंद्र गाठत भेट दाखविली. दुपारी २.३१ वाजता उमापूरच्या डॉक्टरने भेट दिल्याचा फोटो सोशल मीडियाच्या ग्रुपवर टाकला. ही पळवाट केवळ कारवाई टाळण्यासाठी होती. परंतु डॉ. मोरे यांची परवानगी न घेताच ते गायब झाल्याने कारवाई अटळ आहे. न झाल्यास वरिष्ठांचेही त्यांना पाठबळ आहे, हे सिद्ध होईल.
---
संबंधित डॉक्टर विनापरवानगी गैरहजर राहिले होते. त्यांना नोटीस बजावली आहे. खुलासा येताच पुढील निर्णय घेतला जाईल. यापुढे नियमित डॉक्टर ओपीडीमध्ये हजर दिसतील.