शिरसदेवी : शिरसदेवी येथील शेतकरी अशोक पंडित यांनी पाच गुंठे झेंडूच्या शेतातून एक लाख रूपयांचे उत्पादन घेतले. गेवराई तालुक्यातील शिरसदेवी येथील तरूण शेतकऱ्याने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या मागे न लागता आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध पध्दतीने नवनवीन पिके घेत उत्पन्न मिळवण्याचे ठरवले.
अशोक पंडित यांनी आपल्या पाच गुंठे शेतात ठिबक सिंचनाच्या साह्याने १ हजार रोपट्याची झिंगझिंग पध्दतीने तीन बाय चारवर लागवड केली. शेणखताचा वापर करून योग्य वेळी फवारणी केली. फवारणी आणि रोपट्याचा खर्च दहा हजार रूपये केला. खर्च वजा जाता एक लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. त्यांच्याकडे शेतात गुलाब फुलांचे उत्पन्न घेतले जाते. त्यांच्या पत्नी ललिता उच्चशिक्षित बी ए बीएड पूर्ण केलेल्या आहेत. तरीही शेतकामासाठी वेळोवेळी मदत करतात. झेंडूच्या फुलाच्या माळा बनवणे, त्या विकणे यासारखे काम करतात. फुलाच्या माळा बनवणे व विकणे हा त्यांचा व्यवसाय होऊन बसला आहे. ग्रामीण भागात लग्नाच्या कार्यक्रमात व विविध समारंभात तात्काळ फूल उपलब्ध करण्याचे कार्य पंडित कुटुंबाकडून केले जाते.
लोकमत प्रतिनिधीशी बोलताना अशोक पंडित म्हणाले की, पारंपरिक पध्दतीने शेती करण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवनवीन प्रयोग करून कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पन्न मिळवणे काळाची गरज आहे. त्या दृष्टीने पंडित यांनी मेहनत घेऊन उत्पन्न मिळविले आहे.