- नितीन कांबळेकडा (जि. बीड) : आमची परिस्थिती अशी फाटकी, मोलमजुरी केल्याशिवाय पोटाला अन्न मिळत नसायचं; पण लेकरं उपाशी राहू नयेत म्हणून हाडाचं काडं अन् रक्ताचं पाणी झालं तरी आम्ही दोघांनी मागे नाही पाहिलं. पोराचं शिक्षण करायसाठी काबाडकष्ट केलं आणि याच सगळ्या कष्टाचं त्याने चीज केलंय. ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने देशाचे नाव रोशन केले आहे. आता पुन्हादेखील तो देशाची मान उंचीवर नेईल, असा आत्मविश्वास अविनाश साबळेच्या वडिलांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला आहे.
आष्टी तालुक्यातील मांडवा येथील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अविनाश साबळे याचा १३ सप्टेंबर १९९३ साली जन्म झाला. आई, वडील हाताला मिळेल ते काम करून प्रपंच चालवायचे. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेवून जिद्द, चिकाटी, कष्टाच्या जोरावर त्याने गावचे नाव रोशन केले आहे. मोलमजुरी करून आई, वडिलांनी शिक्षण दिले. या काबाडकष्टाचे चीज करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेऊन रक्ताचे पाणी करत त्याने मैदानी खेळाला चॅलेंज करून आगळेवेगळे करिअर करण्याचे ध्येय समोर ठेवत ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे नाव रोशन केले. आता पॅरिस येथे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तो सज्ज झाला असून, तो जिंकून पुन्हा देशाचं नाव रोशन करेल, असा विश्वास वडील मुकुंद साबळे यांनी व्यक्त केला आहे.
२०१९ मध्ये टोकिओ ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व, २००६ ते २०१० या दरम्यान तो औरंगाबाद येथील क्रीडा प्रबोधिनीत असणाऱ्या अविनाशने आतापर्यंत ९ वेळेस राष्ट्रीय विक्रम केले. २०१८ मध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवताना दोहा येथील आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारा अविनाश बारावीनंतर लष्कर सेवेत दाखल झाला. त्याने गोपाळ सैनी यांचा ३७ वर्षांपूर्वीचा स्टीपलचेजमध्ये राष्ट्रीय विक्रम मोडीत काढण्याचा भीम पराक्रम केला. ३००० मीटर स्टीपलचेजमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.
बाप म्हणून खूप आनंद वाटतोआम्ही शिक्षण दिलं त्याचं त्याने मेहनतीच्या जोरावर सोनं केलं. आज आख्ख्या जगात त्याचं नाव आहे. जिवाची पर्वा न करता तो धावतोय. त्याचा खेळ पाहून आमचा आनंद गगनात मावत नाही. आम्ही शेतात काम करून मोबाइल, टीव्हीवर त्याची स्पर्धा बघतो. अक्षरशः डोळ्यात पाणी येते. एवढी मेहनत पाहताना बाप म्हणून खूप आनंद वाटतो.-मुकुंद साबळे, मांडवा, ता.आष्टी (अविनाशचे वडील)