विजयकुमार गाडेकर
शिरूर कासार : कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत असलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये आता टाळ मृदंगाचा गजर घुमत आहे. मंदिरात होणारे भजन, कीर्तन, प्रवचनाने जागा बदलली असून कोरोनाबाधितांचे मनोबल वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शरीर स्वास्थ्यासाठी आहार तर मनशांतीसाठी अध्यात्माचा आधार महत्त्वपूर्ण असल्याने सेंटरवर असे संगीत भजनाचे कार्यक्रम होऊ लागले आहेत. शिरूर येथेही प्रवचन, भजन ,भारूड कार्यक्रम नुकताच पार पडला.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कोरोनाबाबत जाणीव जागृती करण्यासाठी लोककलेचा व पारंपरिक भजन,भारूड, कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून हे काम करण्यास सुचवले आहे. कलाकारांना याचे मोबदल्यात मानधन देण्याची तरतूद केली आहे. कलाकाराने आपल्या कलेच्या माध्यमातून कोरोना नियमावली ,हात स्वच्छ धुणे ,मास्कचा वापर आदीबाबत कला सादरीकरणातून जागृती करून रूग्णांचे मनोबल वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
येथील शासकीय निवासी वसतिगृहात तालुका प्रशासनाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी, डॉ. मिसाळ , डॉ. राठोड यांची उपस्थिती होती. सूत्रसंचलन नाट्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. केशव भागवत यांनी केले होते. सेंटरमधील बाधित रूग्णांनी प्रवचनाचा व भजनाचा आस्वाद घेतला. संगीतात दुःख विसरण्याची ताकद असते तर आध्यात्मिक विचार माणसाचे मनोधैर्य वाढवत असल्याने औषधी उपचारांबरोबर असे कार्यक्रम रूग्णांना फायद्याचे ठरत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी सांगितले.
-----
ब्रम्हरस घेई काढा तेणे पीडा वारेल
डॉ .भाऊसाहेब नेटके यांनी " ब्रम्हरस घेई काढा तेणे पीडा वारेल " या अभंगावर विवेचन करून बाधित रूग्णांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. तर संगीत विशारद जीवन महानुभव ,कृष्णा खोले (मृदंग ), राम क्षीरसागर यांनी संगीत भजन सादर करून वातावरणात चैतन्य आणले.
-------
फाेटो : शिरूर कासार येथील शासकीय निवासी वसतिगृहातील कोविड केअर सेंटरमध्ये रूग्णांसाठी भजन, कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
===Photopath===
130521\vijaykumar gadekar_img-20210511-wa0098_14.jpg~130521\img-20210511-wa0108_14.jpg