बीड : तालुक्यातील घाटसावळी येथील एसबीआय बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सर्व प्रस्ताव योग्य असतानाही वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठविल्याचे कारण दिले जात असल्याने शेतकरी वैतागले आहेत. आठवडाभरात सर्व फाइल मंजूर न झाल्यास बँकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी दिला आहे.
जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जगविलेली पिके अतिवृष्टीने भुईसपाट झाली. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला. असे असतानाच आता एसबीआय बँकेतही शेतकऱ्यांची हेळसांड सुरू झाली आहे. पीक कर्जाचे जुने-नवे करण्यासह नवीन कर्ज देण्यास बँक अडथळे आणत आहे. तसेच ज्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली, अशांनाही वेळेवर कर्ज मिळत नसल्याचे चित्र घाटसावळी येथे आहे. शेतकऱ्यांनी विचारणा केल्यावर वरच्या शाखेत पाठविले आहेत, तिकडेच प्रलंबित असून त्यांनाच विचारा, अशी उडवाउडवीची उत्तरे शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहेत. या वेळी शेतकऱ्यांना अरेरावी आणि अपमानास्पद वागणूक दिल्याच्या तक्रारीही शेतकऱ्यांनी केल्या आहेत. हे सर्व कर्ज देऊन प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा घाटसावळी परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.
---
पीक कर्जाच्या जवळपास ३०० फाइल वरच्या शाखेत पाठविलेल्या आहेत. त्यांच्याकडेच त्या प्रलंबित आहेत.
- प्रताप दुबे, शाखाधिकारी, एसबीआय बँक, घाटसावळी