अंबाजोगाई (बीड ) : वीजचोरी झाकण्यासाठी विद्युत कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यात शिक्षा मिळणार याची जाणीव झाल्याने एकाने स्वतः मयत झाल्याचे प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले. त्यामुळे न्यायालयाने प्रकरण बंद केले. परंतु, दुसऱ्या एका गुन्ह्याच्या तपासात सदरील इसम जिवंत असल्याचे चाणाक्ष पोलिसांच्या नजरेतून सुटले नाही. अखेर १८ वर्षानंतर त्याला शिक्षा ठोठावण्यात तर आलीच, सोबत फसवणुकीच्या गुन्ह्याचीही नोंद त्याच्यावर करण्यात आली आहे.
एखाद्या चित्रपटाचे काल्पनिक कथानक वाटावे असा हा प्रकार अंबाजोगाई तालुक्यात घडला आहे. विष्णुदास रंगराव दराडे (वय ५२) असे या ‘मि. नटवरलाल’चे नाव आहे. दरडवाडी येथील विष्णुदास विद्युत तारेवर आकडा टाकून वीजचोरी करत असे. २००१ साली विद्युत कर्मचारी तपासणीला येत असून त्यांनी आकडा पाहिला तर लाखोंचा दंड होईल याची जाणीव झाल्याने त्याने कमी तीव्रतेचा गुन्हा नोंद व्हावा यासाठी चलाखीने रस्त्यातच कर्मचाऱ्यांना अडवले. अपेक्षेप्रमाणे त्याच्यावर फक्त शासकीय कामाजात अडथळा आणल्याप्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. त्यानंतर मार्च २००८ मध्ये अंबाजोगाई येथील प्रथमवर्ग न्यायालयाने त्याला शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी २ वर्षे सक्तमजुरी आणि ५०० रु. दंड व अडवणूकीसाठी १ वर्षे सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या निकालाविरोधात विष्णुदासने अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायलयात याचिका दाखल केली. इथेही शिक्षा कायम राहणार हे लक्षात आल्याने विष्णुदासने शक्कल लढविली आणि स्वतः मयत झाल्याचे बोगस प्रमाणपत्र वडिलांमार्फत न्यायालयात सादर केले. त्यामुळे २०१७ मध्ये न्यायालयाने सदरील प्रकरण बंद केले.
दरम्यान, काही महिन्यांनंतर विष्णुदास आणि त्याच्या भावाचा वाद झाला. भावाने बर्दापूर पोलिसात धाव घेत विष्णुदासने मारहाण केल्याची फिर्याद दिली आणि त्याच्यावर गुन्हा नोंद केला. या गुन्ह्याचा तपासात विष्णुदासची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहत असताना तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक विसपुते यांना त्याची संपूर्ण कुंडली सापडली आणि स्वतःला मयत दाखवून त्याने न्यालायालायची फसवणूक केल्याचेही त्यांच्या लक्षात आले. विसपुते यांनी तातडीने ही बाब न्यायालयास कळविली आणि विष्णुदासवर फसवणुकीचाही गुन्हा दाखल केला. त्यानंतर न्यायालयाने पहिले प्रकरण पुन्हा चालू केले आणि सुनावणीअंती जिल्हा व सत्र न्या. अनिल सुब्रमण्यम यांनी खालच्या न्यायालयाने विष्णुदासला ठोठावलेली शिक्षा कायम ठेवली.
या प्रकरणी सरकारी वकील ॲड. अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले त्यांना ॲड. एन. एस. पुजदेकर यांनी सहकार्य केले. दरम्यान, विष्णूदासचे फसवणुकीच्या गुन्ह्याचे प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे.