धारुर : तालुक्यातील आंबेवडगाव येथे बंगाली डॉ. विश्वास हे मागील अनेक दिवसांपासून रुग्ण तपासणी करून व्यवसाय करत होते. त्यांच्याकडे अधिकृत कोणतीही डिग्री नसल्याचे सांगण्यात येते. मंगळवारी सकाळी १० वाजता गांवदरा येथील ऊसतोड मजूर तपासणीसाठी डॉ. विश्वासकडे गेला होता. त्याला इंजेक्शन दिले होते. काही वेळाने गावंदरा येथे घरी नेल्यानंतर या ऊसतोड मजुराची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला आंबेवडगाव येथील उपचार केलेल्या डॉक्टरकडे नेत असतानाच त्याचा वाटेत मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी मृतदेह आंबेवडगावातील दवाखान्याच्या बाहेर आणून ठेवला. यामुळे दीड तास गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मृताचे नातेवाईक आणि आंबेवडगावातील लोक संबंधित डॉक्टरला विचारणा करीत होते. मात्र डॉक्टर समाधान करू शकला नाही. तर गावातीलच काही जणांनी मयत मजुराच्या नातेवाइकांची समजूत काढली. त्यामुळे कुठलीही कारवाई न होता मृतदेह नेण्यात आला व अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र दिवसभर या मृत्यू प्रकरणाची चर्चा जिल्हाभरात होती. यापूर्वी आंबेवडगावातील या डॉक्टरवर आरोग्य विभागाने दोन वेळा कारवाई केलेली आहे. तरीही सर्रासपणे त्याची दुकानदारी सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तक्रार नसल्याने काय करणार
अंबेवडगाव येथील घटनेबद्दल कोणाची तक्रार नसल्याने कारवाई कशी करावी, हा प्रश्न आहे. मात्र आरोग्य यंत्रणा या बोगस डॉक्टरवर लवकरच कारवाई करील. -- डॉ. स्वाती डिकले, तालुका आरोग्य अधिकारी, धारूर.
कायदेशीर कारवाई करू
आंबेवडगाव येथील घटनेबाबत कोणाचीच तक्रार नसल्याने कारवाई करता आलेली नाही. मात्र आरोग्य विभागाशी चर्चा करून कायद्यानुसार या संबंधित बोगस डाॕॅक्टरवर कारवाई केली जाईल.-- सुरेखा धस, पोलीस निरीक्षक.
----------
तक्रारीची प्रतीक्षा कशासाठी
बोगस डॉक्टरांवर नजर ठेवून कारवाईबाबत शासन व जिल्हा प्रशासनाचे निर्देश आहेत. तरीही बीड, गेवराई, धारूर व अन्य तालुक्यातील ग्रामीण भागात मेडिकल काउन्सिलची परवानगी नसताना बेकायदेशीरपणे रुग्णांवर उपचार केले जात आहे. अशा उपचार करणाऱ्यांची तपासणी व कारवाई झाल्याचे क्वचितच आढळते. या डॉक्टरांवर कारवाईसाठी कायदेशीर अधिकार असताना प्रशासनातील अधिकाऱ्यांची बोटचेपी भूमिका आरोग्य व्यवस्थेलाच बाधा आणत असल्याने आंबेवडगावसारख्या घटना घडल्यास जबबादार कोण, असा सवाल केला जात आहे.