बीड : विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून जनजागृतीसाठी एक लघुपट तयार करण्यात आला होता. या लघुपटास केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या लघुपट महोत्सावात सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे. या लघुपटाच्या दिग्दर्शिका आरती बागडी यांनी हैदराबाद येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ््यात बुधवारी हा पुरस्कार स्वीकारला.विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत मतदारांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे, तसेच मतदान एका पक्षाला करण्यासाठी कोणी दबाव आणत असेल तर त्या दबावाला कोणीही बळी पडू नये. तसेच कोणी आमिष दाखवून किंवा दबाव टाकत असेल तर, मतदारांनी पोलिसांशी संपर्क साधावा यासाठी जिल्हा पोलीस दलाने जनजागृतीपर लघुपटाची निर्मिती केली होती. या लघुपटात पोलीस दलातील कर्मचारी तसेच स्थानिक कलाकारांनी अभिनय केला होता. या लघुपटास ‘आम्ही दक्ष मतदारांचा पक्ष’ असे नाव देण्यात आले होते. लघुपटाचे दिग्दर्शन आरती बागडी यांनी केले होते.हैदराबाद येथे ग्रामीण भागातील विविध विषयांवर जनजागृती करणाऱ्या प्रदर्शित लघुपटासाठी पुरस्कार वितरण करण्यात येणार होते. यासाठी महोत्सवाचे आयोजन केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने केले होते. यामध्ये विविध राज्यांतील शेकडो लघुपटांचा सहभाग होता. यामध्ये ‘आम्ही दक्ष मतदारांचा पक्ष’ लघुपटास सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाआहे.
पोलिसांच्या लघुपटास केंद्राचा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:56 PM