बीड : कोरोना लसीकरणासंदर्भात जनजागृतीसाठी राज्यभर महाभियान राबविले जात आहे. यासाठी राज्यात १६ चित्ररथ, ८०० कलावंत दररोज १ हजार १४० कार्यक्रम घेत आहेत. 'कोरोनाला हरवू या, देशाला आत्मनिर्भर बनवू या' हे घोषवाक्य घेऊन या रथाने बीडमध्ये जनजागृती सुरू केली आहे.
केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा राज्य यांच्या माध्यमातून कोरोना लसीकरण आणि आत्मनिर्भर अभियान या विषयावर जनजागृती केली जात आहे. यासाठी राज्यात १६ चित्ररथ तयार केले आहेत. या एका एलईडी स्क्रीनसह, ऑडिओ, व्हिडिओद्वारे माहिती दिली जात आहे. तसेच ८०० कलावंतांकडून कला, शाहिरी, गीते आदींच्या माध्यमातून जनजागृती करण्यासह आवाहन केले जात आहे. दररोज ११४० कार्यक्रम घेतले जाणार असून राज्यभरात ११ हजार ४०० कार्यक्रम घेणार आहेत. या चित्ररथाच्या माध्यमातून कोरोना लसीकरण आणि आत्मनिर्भर अभियान तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण व शहरी भागात दिली जात आहे.
दरम्यान, शुक्रवारी सकाळीच हा रथ बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या रथाला जनजागृतीसाठी मार्गस्थ करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, नोडल ऑफिसर डॉ.संजय कदम, डॉ.एल.आर.तांदळे, डॉ.नरेश कासट, डॉ.ज्ञानेश्वर निपटे, डॉ. पी. के. पिंगळे आदींची उपस्थिती होती.
बीडमध्ये ९ तालुक्यात कार्यक्रम
जिल्ह्यात ९ तालुक्यात हा चित्ररथ जाऊन कार्यक्रम घेणार आहे. यात बीड, पाटोदा, आष्टी, शिरूरकासार, गेवराई, माजलगाव, वडवणी, धारूर आणि केज तालुक्याचा समावेश आहे. पुढील १० दिवस हा रथ बीडमध्ये असणार आहे.
===Photopath===
260221\262_bed_33_26022021_14.jpeg
===Caption===
जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी हिरवी झेंडी दाखवून रथ मार्गस्थ केला. यावेळी डॉ.संजय कदम, डॉ.एल.आर.तांदळे, डॉ.नरेश कासट, डॉ.ज्ञानेश्वर निपटे, डॉ.पी.के.पिंगळे आदी उपस्थित होते.