अंबाजोगाई : ‘मानवलोक’च्या वतीने आरोग्यासाठी लोकाधारित कृती कार्यक्रमांतर्गत अंबाजोगाई तालुक्यातील ३५ गावांत फेब्रुवारी २०२१ मध्ये ग्राम आरोग्यदूताची निवड केली. गावोगावी आरोग्याचे स्वयंस्फूर्तीने काम हे दूत करीत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना, लसीकरण याबाबत माहिती देऊन हे दूत जनजागृती करीत आहेत.
काम करण्याची आवड असलेला व कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा नसलेल्या व्यक्तीची निवड ग्रामपंचायतीमार्फत करून देण्यात आली होती. मार्च महिन्यामध्ये या सर्व ग्राम आरोग्यदूतांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर लगेचच कोरोनाची दुसरी लाट बीड जिल्ह्यात आली. या लाटेचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात जास्त दिसत आहे. कोरोनाबाबत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अफवा पसरत असल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा जोमाने कार्य करीत आहे. त्यांच्या सोबतीला ग्राम आरोग्यदूतही गावात विविध उपक्रम राबवीत आहेत.
कोरोना आजाराबद्दल विविध माध्यमातून जाणीव-जागृती करणे, कोरोना लसीकरण कार्यक्रमाबाबत जाणीव-जागृती, गावातील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करून घेणे, कोरोनाबाधित रुग्ण व नातेवाइकांना धीर देणे व सहकार्य करणे, गावातील मिशन झीरो डेथ उपक्रमात सहभागी होऊन हा उपक्रम राबवून घेणे, गरीब कुटुंबांना रेशन उपलब्ध करून देणे, गावातील आरोग्य उपकेंद्रात कोविड लसीकरण मोहीम राबविणे, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावर मिळणाऱ्या सेवा सुविधेची माहिती ग्रामीण जनतेला देणे, अंगणवाडीत चांगला पोषण आहार मिळण्यासाठी पुढाकार घेणे, गावात स्वच्छता उपक्रम राबविणे, गावपातळीवर प्राप्त १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून आरोग्य सेवा बळकट करणे इत्यादी कामे ग्राम आरोग्यदूत करीत आहेत.