बीड : जिल्हा बँक व ‘नाबार्ड’च्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील चौसाळा शाखेंतर्गत उदंड वडगाव, मोरगाव, पानगाव येथे आर्थिक डिजिटल साक्षरता मेळाव्यातून जनजागृती करण्यात आली.
प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अविनाश पाठक, अशोक कदम, कवडे यांच्या निर्देशानुसार, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद ठोंबरे, उपव्यवस्थापक रवी उबाळे, ज्येष्ठ तपासणीस सर्वज्ञ यांच्या उपस्थितीत हे मेळावे घेतले जात आहेत.
जास्तीत जास्त खातेदारांनी एटीएमचा वापर करावा. कुठल्याही एटीएममधून शॉपिंग मॉल, पेट्रोल पंप येथून पैसे काढता येतात. जिल्हा बँकेमार्फत एसएमएस सुविधा उपलब्ध असून, खात्यातील जमा रक्कम व शिल्लक किती आहे, हे शेतकऱ्यांनी कसे तपासावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बँकेत ठेवलेल्या ठेवींवर पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण असल्याने जिल्हा बँकेमध्ये आपल्या ठेवी ठेवण्याचे आवाहन यावेळी अधिकाऱ्यांनी केले. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व जीवन ज्योती विमा योजना या दोन्ही विमा योजनांचा जास्तीत जास्त खातेदारांनी लाभ घ्यावा व जास्तीत जास्त ठेवी ठेवून बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ठोंबरे, उबाळे यांनी केले.
या साक्षरता अभियान कार्यक्रमात ज्येष्ठ तपासणीस सर्वज्ञ यांनी नाबार्डमार्फत पुरविण्यात आलेल्या मार्गदर्शनानुसार प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेतला. त्याला खातेदार व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यातील विजेत्यांना बक्षिसांचे वाटपही करण्यात आले. या मेळाव्यासाठी चौसाळा शाखेचे अधिकारी प्रशांत बीडकर, तपासणीस डी. पी. जोगदंड, कुडके, गटसचिव काळे, दराडे, सुनील कागदे, सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन शि.प्र. येडे, शंकरराव भड, सुंदरराव भड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
130921\13bed_5_13092021_14.jpeg
मेळावा