बीड : ज्या दाम्पत्यांना मूल होत नाही, ते ऑनलाईन नोंदणी करून बाळ दत्तक घेत आहेत. परंतु नोंदणी करूनही तीन ते चार वर्षे बाळासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे शिशुगृहाकडून माहिती मिळाली. आता याच अनुषंगाने बीडमध्येही पहिल्यांदाच अशी संस्था शांतीवनमध्ये उघडली आहे. या दत्तक प्रक्रियेत मुलांपेक्षा मुलींना अधिक मागणी असल्याचे सांगण्यात आले.
अनैतिक संबंध, अत्याचार व इतर कारणांमधून जन्मलेली मुले रस्त्यावर टाकून दिली जातात, किंवा अज्ञातस्थळी सोडले जातात. ते सापडताच त्यांच्यावर उपचार करून सर्व कायदेशीर प्रक्रिया करून या मुलांना शिशुगृहात ठेवले जाते. बीडमधील मुलांना आतापर्यंत लातूर, औरंगाबाद आणि अहमदनगर येथील शिशुगृहात पाठविले जात होते. परंतु मागील काही महिन्यांपासून शिरूर तालुक्यातील आर्वी येथील शांतिवनात सुलभा सुरेश जोशी या नावाने शिशुगृह सुरू केले आहे. आता सर्व मुले याच शिशुगृहात ठेवली जातात. संचालक कावेरी व दीपक नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काळजी घेतली जाते. यासाठी डॉक्टर, परिचारीका, काळजीवाहक, स्वयंपाकी आदी कर्मचारी कार्यरत आहेत.
दरम्यान, ज्यांना बाळ दत्तक हवे आहे, त्यांच्याकडून 'कारा.एनआयसी.इन' या संकेतस्थळावर नोंदणी केली जाते. कोणत्या राज्यातील बाळ हवे आहे, याचाही उल्लेख यात असतो. मुलगा हवा की मुलगी हे सुद्धा यात नमुदे केले जाते. नोंदणी केल्यापासून साधारण तीन ते चार वर्षे प्रतिक्षा करावी लागते. अनेकदा एवढ्या कालावधीतही बाळ मिळाले नाही, तर पुन्हा अशी प्रक्रिया करावी लागत असल्याचे सांगण्यात आले.
मुले टाकून देऊ नका
जिल्ह्यात वर्षाकाठी जवळपास २० ते ३० मुले रस्त्यावर अथवा इतर ठिकाणी टाकले जातात. परंतू ज्यांना मुल नको असेल त्यांनी ते टाकून देऊ नये. त्या बाळाची काळजी घेण्यासाठी शिशुगृह आहे. यासाठी बालकल्याण समिती, चाईल्ड लाईन, जिल्हा महिला बालविकास अधिकारी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठाणला संपर्क करा. त्यांच्याकडे कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर हे बाळ शिशुगृहात पाठविले जाते. परंतू त्याला रस्त्यावर फेकणे, उकिरड्यावर, नालीत टाकणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी सांगितले.
अपंग बालकांचे हाल
जी बालके सदृढ आहेत, अशांना जास्त मागणी भेटते. परंतु जे अपंग, मतीमंद आहेत, त्यांना कोणीही दत्तक घेण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे त्यांचे हाल होतात. शिशुगृहात त्यांचा सांभाळ केला जातो.
त्या बालकाला स्पेनमधून मागणी
बीडमधील एका एचआयव्ही बाधित दाम्पत्याने मुलाला जन्म दिला. परंतू काही दिवसानंतर त्यांचे निधन झाले. हे बाळ एका शिशुगृहात टाकले. एचआयव्हीच्या गैरसमजामुळे त्याला कोणीच दत्तक घेत नव्हते. अखेर स्पेनमधील एका दाम्पत्याने हे बाळ दत्तक घेतल्याचे तत्तवशील कांबळे यांनी लोकमतला सांगितले.