माजलगाव शहरालगत भावडगाव नवीन वसाहत आहे. या गावची लोकसंख्या ही चार हजारांच्या घरात आहे. माजलगाव शहरापेक्षा नागरिकांची भाटवडगाव शिवारात जागा घेण्याकडे व घरे बांधण्याकडे जास्त कल दिसून येत आहे.
या गावात मोठमोठाली घरे, काॅम्प्लेक्स उभारली जाऊ लागल्याने येथील ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. या ग्रामपंचायतीस चांगले उत्पन्न मिळत असतानादेखील या ठिकाणच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, उन्हाळ्यातदेखील या रस्त्यावरून चालले मुश्कील होत असते. सध्या पावसाळा सुरू झाल्याने या गावातील प्रत्येक रस्त्यावर गुडघ्याएवढा चिखल होत आहे. या रस्त्यावरून नागरिकांना चालताना मोठी कसरत करावी लागते तर या भागातील नागरिकांना दुचाकीसुद्धा घरी घेऊन जाता येत नाही.
भाटवडगाव या ठिकाणच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असताना येथील ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे एक कणही मुरूम टाकला नसल्याने नागरिकांना परेशानीचा सामना करावा लागत आहे.
आम्ही तहसीलदार यांच्याकडे मुरूम टाकण्यासाठी परवानगी मागितली आहे. मुरमाची परवानगी मिळताच मुरूम टाकण्यात येईल.
-एस.एम. चव्हाण, ग्रामसेवक